गुगलचा मॅनेजर बनून 50 तरुणींना गंडा, लग्नाचं आमिष देऊन बनवले शारीरिक संबंध

गुगलचा मॅनेजर आहे असं सांगून एका तरुणाने 50 तरुणींना गंडा घातल्याचं वृत्त आहे. गुजरातच्या अहमदाबाद पोलिसांनी या ठगाला बेड्या ठोकल्या आहेत.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, या तरुणाचं नाव संदीप शंभुनाथ मिश्रा असं आहे. त्याने मॅट्रिमोनियल साईट्सवर स्वतःचं अकाउंट उघडलं. त्यात त्याने स्वतःचं नाव विहान शर्मा असं टाकलं. मॅनेजमेंटचा विद्यार्थी असल्याचं सांगून तो तिथे गुगलमध्ये काम करत असल्याची माहिती देत असे. स्वतःचा पगार त्याने 40 लाख असल्याचंही तिथे दाखवलं होतं.

त्याची प्रोफाईल पाहून अनेक श्रीमंत घरातील तरुणी त्याच्याशी संपर्क करत असत. तो आधी त्यांचा विश्वास जिंकायचा. त्यांच्याशी गोड बोलून त्यांना भुलवायचा आणि त्यांच्यासोबत लग्नाची बोलणी सुरू करायचा. तरुणी जाळ्यात फसली की तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा. त्यानंतर तिचे पैसे घेऊन फरार व्हायचा. त्यासाठी त्याने आकाश, विहान आणि प्रतीक शर्मा अशी नावं तो घ्यायचा आणि नवीन तरुणीला फसवायचा.

अशा प्रकारे त्याने अहमदाबाद, मध्य प्रदेश, उज्जैन, ग्वाल्हेर, छत्तीसगड आणि गोवा येथील 50 तरुणींना फसवून त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. अहमदाबाद येथे एका तरुणीला फसवल्यानंतर तिने पोलिसात तक्रार दाखल केली. नोव्हेंबर 2020पासून पोलीस त्याला शोधत होते. अखेर बऱ्याच प्रयत्नांनंतर हा भामटा पकडला गेला.

आपली प्रतिक्रिया द्या