बक्षीस लागलय सांगून 32 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक, नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा

‘तुम्हाला 1 हजार रुपयांचे ऑनलाईन बक्षीस लागले आहे’ असे आमिष दाखवत परभणीतील एकाची 32 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

मंगळवार, 2 मार्च रोजी दुपारच्या सुमारास अजित मदन भोसले यांना एक कॉल आला. यावेळी समोरील इसमाने फोन-पेवर 1 हजार रुपयांचे बक्षीस लागले असल्याचे सांगीतले. यासाठी तुम्ही आम्ही सांगतो ती अ‍ॅप डाऊनलोड करा, असे सांगीतले. त्यानंतर भोसले यांनी त्याच्या सांगण्यानुसार डाऊलोड करून घेतले.

त्यानंतर तात्काळ त्यांना बँक खात्यातून 16 हजार रुपये कपात झाल्याचा मॅसेज आला. बुधवार, 3 मार्च रोजी पून्हा सदर इसमाने तीच कारवाई करायला लावली. गेलेले पैसे परत येतील या आशेने त्यांनी ती कारवाई केली. त्यानंतर गुरुवार, 4 मार्च रोजी पून्हा त्यांच्या खात्यातून 16 हजार रुपये कपात झाले.

यानंतर भोसले यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता, फोन-पेद्वारे पैसे ट्रान्स्फर केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. यावरून नानलपेठ पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कुंदन वाघमारे करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या