चाकूचा धाक दाखवून ट्रकचालकास दोघांनी लुटले

45

सामना प्रतिनिधी, नगर

वाहनचालकांना रस्त्यात अडवून धाक दाखवून लुटणाऱ्या चोरानी पुन्हा डोके वर काढले असून वाळूंज बायपासने जाणार्या ट्रकचालकास अडवून दोन अनोळखी इसमांनी चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील दोन मोबाईल, रोख रक्कम असा 11 हजार 500 रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि.9) साडेनऊ वाजता सोलापूर रोडवरील वाळूंज बायपास चौकाजवळ घडली.

शहराच्या बाहेरून जाणाऱ्या महामार्गावरून जाणार्या वाहनचालकाना, चालकांना अडवून शस्त्राचा धाक लावून लुटण्याच्या घटनात वाढ झाली असून, महामार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकात लुटारूंची दहशत पसरली आहे. शहर पोलीस व महामार्ग पोलिसांची महामार्गावर गस्त नसल्याने अशा लुटमारीच्या घटना वाढत आहेत, असे वाहनचालकांनी बोलताना म्हटले आहे. नुकतीच वाळूंज बायपासजवळ ट्रक चालकास लुटल्याची घटन घडली आहे.

याबाबतची माहिती अशी की, विकास हरलाल विष्णोई (रा. खोकरिया ता.भोपाल गड, जि. जोधपुर) हे त्यांचा ट्रक (क्र. आर.जे.19 जीई 5115) मध्ये साखर भरून सदर माल नियोजित ठिकाणी पोहोचविण्यासाठी सोलापूर रोडने जात असता वाळूंज बायपास चौकाजवळ सुमारे 200 मीटर अंतरावर त्यांनी ट्रक रस्त्याच्या कडेला थांबवून लघुशंकेकरिता थांबले. ते केबिनमध्ये बसलेले असताना त्याच वेळेस दोन अनोळखी इसम केबिनमध्ये बळजबरीने शिरले आणि त्यांनी ट्रक चालकास व क्लिनरला चाकूचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी देवून त्याच्याकडील 3 हजार 500 रुपये, 5 हजार रुपये व 3 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल बळजबरीने चोरून नेला. याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी विकास विष्णोई याच्या फिर्यादीवरून भा.द.वि कलम 392 प्रमाणे जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पालवे हे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या