
‘प्रबळ इच्छाशक्ती असेल तर जगातली कुठलीही गोष्ट अशक्य नसते’, हे सांगलीतील दत्तात्रय लोहार यांनी जगाला दाखवून दिले आहे. आपल्या तीन मुली आणि एका मुलाला दुचाकीवरून शाळेत सोडताना त्यांना अनेक अडचणी यायच्या. आपलीही चारचाकी असावी अशी त्यांच्या मुलांची इच्छा होती, परंतु बेताच्या परिस्थितीमुळे दत्तात्रय यांनी चारचाकी घेणे त्यांना शक्य नव्हते. मात्र परिस्थितीपुढे हार न मानता त्यांनी भंगार आणि दुचाकीच्या भागांपासून घरच्या घरी ‘मिनी जिप्सी’ तयार केली आहे. त्यांच्या या अफलातून गाडीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून दत्तात्रय यांच्या क्रिएटिव्हीटीचे नेटिझन्स कौतुक करत आहेत.
सांगलीतील कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे येथे दत्तात्रय लोहार राहतात. त्यांचे फॅब्रिकेशनचे वर्कशॉप आहे. वर्कशॉपमध्ये पडलेल्या दुचाकी गाडीचे इंजिन, जीपचे बोनेट, रिक्षाची चाके याचा वापर करून त्यांनी घरच्या घरी मिनी जिप्सी तयार केली आहे. ही गाडी लहान आकाराची असून एका लिटर पेट्रोलमध्ये 40 ते 45 किमी धावते. मिनी जिप्सी बनविण्यासाठी त्यांना दोन महिन्यांचा कालावधी लागला असून साधारण 60 हजार रुपयांचा खर्च आला आहे. या गाडीत एकावेळी चार माणसे प्रवास करू शकतात. गाडीमध्ये दुचाकीचे इंजिन असून ही गाडी स्टार्ट करण्यासाठी किक मारावी लागते. विशेष म्हणजे दत्तात्रय हे अल्पशिक्षित असून त्यांनी कोणतीही पदवी घेतलेली नाही, मात्र केवळ आपल्या कल्पकतेच्या जोरावर त्यांनी ही गाडी तयार केली आहे. ही गाडी जेव्हा त्यांनी आपल्या मुलांना दाखवली त्यावेळी त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
आनंद महिंद्रांनी केले कौतुक
दत्तात्रय यांच्या मिनी जिप्सीचे व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनीदेखील मिनी जिप्सीचा व्हिडीओ ट्विटवर शेअर करत दत्तात्रय यांचे कौतुक केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलेय, ‘हे वाहन नियमांचे उल्लंघन करत असल्याने स्थानिक अधिकारी लवकर किंवा काही दिवसांनी या वाहनावर बंदी आणतील. मी त्यांना या वाहनाच्या बदल्यात नवीकोरी बोलेरो देऊ इच्छितो. कारण असे प्रयोग आपल्याला प्रेरित करतात. दत्तात्रय यांच्या या शोधाला आम्ही महिंद्रा रिसर्च व्हॅलीमध्ये प्रदर्शित करू.’



























































