इंग्रजी विषय करत होता घात, कोरोनामुळे 33 वर्षांनी विद्यार्थी दहावी पास

632

कोरोना संक्रमण रोखण्यासाठी देशभरात केलेल्या लॉकडाऊननंतर अनेक शैक्षणिक बोर्डांनी आपल्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. या विद्यार्थ्यांमध्ये एका 51 वर्षे वयाच्या विद्यार्थ्याचाही समावेश आहे. कोरोनामुळे हा विद्यार्थी तब्बल 33 वर्षांनी दहावी उत्तीर्ण झाला आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, 51 वर्षांचे मोहम्मद नुरुद्दीन गेल्या 33 वर्षांपासून दहावी उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करत होते. हैदराबादच्या शालान्त परीक्षा बोर्डातून ते 1987पासून दहावीची परीक्षा देत होते. मात्र, दरवर्षी त्यांना इंग्रजी विषयात कमी गुण मिळाल्याने ते नापास होत होते. तब्बल 33 वर्षं आपली चिकाटी न सोडता नुरुद्दिन यांनी परीक्षा देणं सुरू ठेवलं होतं.

कोरोना महामारीला रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे सगळ्या बोर्डांनी आपल्या परीक्षा रद्द केल्या. ज्या विषयांचे पेपर दिले, त्यातील मार्कांवरून राहिलेल्या विषयांच्या मार्कांची सरासरी काढण्यात आली. नेमका इंग्रजीचा पेपर राहिल्याने त्यांना उर्वरित विषयांवरून मार्क मिळाले आणि नुरुद्दीन अखेर शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाले.

आपली प्रतिक्रिया द्या