घरच्यांनी दफन केलेला माणूस दोन दिवसांनी घरी परतला!

5303

मृत समजून दफन केलेला माणूस दोन दिवसांनी परत आल्याने कानपूरमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीसही या प्रकाराने चक्रावले असून आता त्यांनी दफन केलेल्या माणसाविषयी शोध घ्यायला सुरुवात केली आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, कानपूरच्या कर्नलगंज इथे 5 ऑगस्ट रोजी एक अर्धवट जळलेला बेवारस मृतदेह सापडला. तो मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्याच दरम्यान, याच परिसरात राहणाऱ्या नगमा नावाच्या महिलेने तिचा नवरा अहमद दोन दिवसांपासून गायब असल्याची तक्रार नोंदवली आणि त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला. त्यामुळे पोलिसांनी सापडलेला बेवारस मृतदेह तिला दाखवला आणि ओळख पटवण्यास सांगितलं. तिने हा आपल्याच नवऱ्याचा मृतदेह असल्याचं सांगितलं. त्यामुळे पुढील कार्यवाही करून तो त्या कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला. कुटुंबाने रीतसर त्याचं दफनही केलं.

दफनविधी उलटून दोनच दिवस होतात, तोच नगमाचा नवरा अहमद घरी परत आला. त्याला बघून त्यांच्या घरात एकच कल्लोळ उडाला. त्याचं आणि नगमाचं मोबाईल चार्जरवरून भांडण झालं होतं आणि तो घरातून निघून गेला होता. चार दिवसांनी राग शांत झाल्यावर तो घरी परतला, तेव्हा त्याला हा प्रकार समजला. त्यांनी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. पोलीसही त्यामुळे बुचकळ्यात पडले. अखेर दफन केलेला तो अज्ञात व्यक्तिचा मृतदेह पुन्हा बाहेर काढण्यात आला. आता पोलीस या मृतदेहाची नव्याने चौकशी आणि पुढील तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या