मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या वर्षभरापासून तापलेला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही उपोषणाचे हत्यार उपसले. या मुद्द्यावरून मराठा समाजही आक्रमक होताना पाहयला मिळत आहे. एकीकडे उपोषण सुरू असताना दुसरीकडे काही तरुण नैराश्यातून थेट आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत असून बीडमध्ये एका तरुणाने जिल्हा परिषदेच्या आवारात फाशी घेऊन जीवन संपवल्याचे समोर आले आहे.
सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही. राज्य सरकार समाजाला फसवत आहे. आरक्षण नसल्याने नोकरी लागेना. या नैराश्यातून तरूणाने टोकाचे पाऊल उचलत खिशामध्ये चिठ्ठी लिहून ठेवत जिल्हा परिषदेच्या आवारात असलेल्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
बीड शहराजवळील उकंडा गावच्या अर्जुन कवठेकर या तरूणाने जिल्हा परिषदेच्या आवारात असलेल्या एका झाडाला गळफास घेतला. आत्महत्याग्रस्त या तरूणाच्या खिशात चिठ्ठी सापडली आहे. त्यात सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही. दिलेला शब्द पाळत नाही. त्यामुळे मराठा बांधवांनी एकजुट व्हावे असे लिहिले आहे. सापडलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे.
अर्जुन कवठेकर हा खासगी बसवर चालक होता. या प्रकरणाचा पोलीस आता तपास करत आहेत. मात्र कवठेकर याच्या आत्महत्येने बीड शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.