बसमधून प्रवास करणाऱ्या अल्पवयीन मुलीचे अपहरण; सतत 15 दिवस केला बलात्कार, आरोपीला अटक

उत्तर प्रदेशातील भदोहीमध्ये एक भयंकर घटना समोर आली आहे. येथे एका 28 वर्षीय तरुणाने 17 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. आरोपी आणि मुलीची बसमध्ये भेट झाली होती. यावेळी तरुणाने मुलीसोबत मैत्री केली आणि तेथून मुलीला पळवून नेले. सध्या पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले असून आरोपीला अटक केली आहे.

भदोही जिल्ह्यातील एका 17 वर्षीय मुलीचे बसमध्ये भेटलेल्या एका 28 वर्षीय तरुणाने अपहरण केले. मुलगी 31 ऑगस्ट रोजी तिच्या पालकांशी भांडण करून घरातून निघून प्रयागराजला जात होती. तेव्हा बसमध्ये बिरू पासी नावाच्या 28 वर्षीय तरुणाशी तिची ओळख झाली. बिरूने मुलीला दमदाटी करून आपल्या घरी नेले. त्याने त्याची बायको हयात नसल्याचे मुलीला सांगितले होते. त्यामुळे तो पुढील काही दिवस पीडितेसोबत पती-पत्नीसारखे राहू लागला. याच गोष्टीचा फायदा घेत त्याने 15 दिवस तिच्यावर बलात्कार केला.

आपली मुलगी घरी परत आली नसल्याच्या काळजीने तिच्या वडिलांनी मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मीनाक्षी कात्यायन यांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. पोलिसांच्या पथकाने तपासाअंती प्रयागराजच्या विकास प्राधिकरण कॉलनीत छापा टाकून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. तसेच आरोपीवर बलात्कार, अल्पवयीन मुलीशी लग्न आणि इतर आरोपांप्रकरणी गुन्हा नोंदवला असून त्याला अटक केली आहे.