
हॉस्पिटलची वारी सुरू झाली की बिलाचा विचार करायचा नसतो, असे सगळेजण म्हणतात. एकदा दवाखान्याची पायरी चढली की खर्च वाढतच राहतो. वेगवेगळ्या चाचण्या, औषधे यासगळ्यांचे मिळून लाखो करोडोंचे बिल हातात येते. अशावेळी माणूसही हतबल होऊन कोणताही सवाल जवाब न करता सगळे पैसे भरतो. मात्र अमेरिकेतील एका व्यक्तीने हुशारीने ही परंपरा मोडीत काढून लाखो रुपयांची बचत केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या (एआय) मदतीने त्याचे रुग्णालयाचे बिल 1.6 कोटी रुपयांवरून फक्त 27 लाख रुपये केले आहे. ही घटना अमेरिकेतील एका रुग्णालयात घडली. एका माणसाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. रुग्णालयाने त्याच्यावर उपचारासाठी अंदाजे 1.6 कोटी रुपयांचे बिल केले.
रुग्णालयाने हे बिल मृत व्यक्तीच्या कुटुंबाला दिले आणि तातडीने रुग्णालयाचे पैसे भरण्यास सांगितले. हे बिल पाहून मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना धक्का बसला. दरम्यान कुटुंबातील एका सदस्याने बिलातील पैशाची पडताळणी करण्यासाठी एआयचा वापर केला. वापरकर्त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म थ्रेड्सवर याबाबत तक्रार केली. जेव्हा एआय चॅटबॉटने संपूर्ण बिलाची तपासणी केली तेव्हा असे आढळून आले की बिलिंगमध्ये अनेक गोष्टी दोनदा नोंदवल्या गेल्याने बिलाच्या रकमेत वाढ झाली होती.
एआयला आढळल्या बिलात अनेक चुका
सुरुवातीला, रुग्णालयाचे बिल $1,95,000 (सुमारे १.६ कोटी रुपये) होते, जे नंतर कमी करून सुमारे २७ लाख रुपये झाले. एआय चॅटबॉटला चुकीचे बिलिंग कोडिंग देखील आढळले. त्यामुळे त्या व्यक्तीने एआयचा वापर करून रुग्णालयाला एक पत्र लिहिले. आणि त्यात रुग्णालयाने बिलात तात्काळ दुरुस्त करावे अशी मागणी केली. जर त्यांनी तसे केले नाही तर न्यायालयात जाण्याची धमकी दिली. त्यानंतर रुग्णालयाने आपली चूक मान्य केली आणि बिलात योग्य ती दुरुस्ती केली. रुग्णालयाने आपली चूक मान्य केल्यानंतर बिलात दुरुस्ती केली. १.६ कोटी रुपयांचे बिल कमी करून 27 लाख रुपये करण्यात आले.


























































