मॅन्चेस्टरमध्ये महात्मा गांधीच्या पुतळ्याला विरोध, वंशवादी असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप

554

ब्रिटनमधील मॅन्चेस्टर कॅथेड्रल बाहेर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा उभारण्यास येथील विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला आहे. गांधीजी वंशवादी होते. ब्रिटीशांच्या आफ्रिकन नागरिकांच्या विरोधातील कारवाईत त्यांनी सहभाग घेतला होता. असा आरोप या विद्यार्थ्यांनी केला असून ‘गांधी मस्ट फॉल’ अभियान सुरू केले आहे.

मॅनचेस्टर कॅथेड्रलच्या बाहेर शहराच्या मधोमध पुढील महिन्यात 25 नोव्हेंबरला गांधीजींचा पुतळा उभारण्यात येणार आहे. जगाला शांति, प्रेम आणि बंधुभावाचा संदेश देण्यासाठी हा पुतळा उभारण्यात येणार आहे. पुढील महिन्यात गांधीजींची 150 वी जयंती आहे. मुर्तीकार राम वी सुतार यांनी हा पुतळा तयार केला आहे. श्रीमद् राजचंद्र मिशन धरमपुर यांनी हा पुतळा भेट म्हणून दिल्याचे मॅन्चेस्टर सिटी काऊंसिलच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे. तसेच स्थानिक अधिकाऱ्यांनी हा पुतळा उभारण्यास परवानगीही दिली आहे. मात्र येथील विद्यार्थी संघटनेची प्रमुख सारा खान हीने गांधीजींचा पुतळा उभारण्यासाठी देण्यात आलेली परवानगी मागे घेण्याची मागणी केली आहे. तसेच याविरोधात विद्यार्थ्यांनी गांधी मस्ट फॉल अभियानही सुरू केले असून मॅन्चेस्टर नगर परिषदेलाही पत्र लिहले आहे.

विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरही पोस्ट टाकली आहे. त्यात महात्मा गांधी वंशवादी होते. आफ्रीकेत स्थानिकांविरोधात ब्रिटीशांनी केलेल्या कारवाईत त्यांनी सहभाग घेतला होता. आफ्रीकन नागरिकांना ते गलिच्छ, असभ्य, जनावरे असे संबोधत असल्याचा आरोप  करत ‘गांधी मस्ट फॉल’ या अभियानात सामील होण्याचे आवाहन  विद्यार्थ्यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या