
चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मांडवा ते गेटवे जलवाहतूक सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे व्यवसाय, कामानिमित्त मुंबई-अलिबाग ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांसह पर्यटकांनादेखील मोठा दिलासा मिळाला आहे. या सेवेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डय़ांच्या कटकटीतून सुटका झाल्याने प्रवाशांचा जीव भांडय़ात पडला आहे. मात्र असे असले तरी परतीचा पाऊस लांबल्याने या मार्गावरील जलवाहतूक अर्धवेळ चालविण्यात येणार आहे.
अलिबागमार्गे मुंबईत जाण्यासाठी सोयीस्कर मार्ग म्हणजे जलवाहतूक बोटसेवा. जून महिन्यात पावसाळा सुरू होण्याआधी मांडवा ते गेटवे ही बोटसेवा पावसाळ्यातील हवामानामुळे चार महिने बंद केली जाते. त्यामुळे अलिबाग तसेच मुंबईत ये-जा करणाऱ्या प्रवाशांना खड्डेमय रस्त्याने प्रवास करावा लागतो. पर्यटकांनाही याचा फटका बसत असल्याने त्यामुळे ही जलवाहतूक अत्यंत सोयीस्कर ठरते. मात्र या वर्षी पाऊस लांबल्याने बोटसेवा सुरू होण्यास उशीर होत होता. आजपासून पुन्हा ही सेवा सुरू झाल्याने हजारो नागरिकांसह पर्यटकांनी आनंद व्यक्त केला आहे. दरवर्षी ही बोटसेवा 1 ते 5 सप्टेंबरपर्यंत म्हणजे गणपती सणाला सुरू होते.
प्रवास महागला
मांडवा ते गेटवे जलवाहतूक बोटसेवा सुरू झाली असली तरी बोटसेवा कंपन्यांनी तिकीट दरात 5 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवास महागल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
























































