भाजपचा एककलमी कार्यक्रम, शिवरायांचा अपमान! महाराष्ट्रात संतापाची लाट

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वारंवार अवमानकारक, अपमानजनक वक्तव्ये करणे हाच भाजपचा एककलमी कार्यक्रम, एककलमी ‘अभियान’ बनले आहे. छत्रपती शिवरायांच्या महापराक्रमाची साक्ष असलेल्या ऐतिहासिक किल्ले प्रतापगडावर मिंधे सरकारमधील भाजपचे मंत्री मंगलप्रसाद लोढा यांनी अमंगल ओकारी केली.

शिवप्रताप दिन कार्यक्रमात बोलताना लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गद्दारीची तुलना चक्क छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेच्या ऐतिहासिक घटनेशी केली. त्यावर कळस म्हणजे ‘शिवरायांना औरंगजेबाने पकडून आग्र्याला नेले’, असे धादांत चुकीचे आणि भयंकर वक्तव्य करून लोढा यांनी अकलेचे तारे तोडले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींपासून भाजप प्रवक्ता सुधांशू त्रिवेदीपर्यंत आणि मंत्र्यांपासून शिवद्रोही छिंदमपर्यंत वादग्रस्त वक्तव्ये करून छत्रपती शिवरायांचा वारंवार अवमान केला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाचा कडेलोट झाला आहे.

छत्रपती शिवरायांचा अवमान वारंवार करण्याचा एककलमी कार्यक्रम असल्याप्रमाणे भाजप नेत्यांनी वादग्रस्त विधानांचा सपाटा सुरूच ठेवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफझलखानाचा वध केल्याच्या घटनेच्या स्मृती जागवणारा शिवप्रतापदिन आज किल्ले प्रतापगडावर शिवप्रेमींच्या अपूर्व उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना मंत्री मंगलप्रभात लोढा यांना शिवरायांच्या जाज्ज्वल्य इतिहासाचे भान राहिले नाही. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गद्दारीची तुलना छत्रपती शिवरायांच्या आग्र्याहून सुटकेच्या घटनेशी केली.

औरंगजेबाने शिवाजी महाराजांना पकडून नेले होते व त्यांना आग्र्याच्या किल्ल्यात बंद करून ठेवले होते, पण शिवाजी महाराज स्वतःसाठी नव्हे, तर हिंदवी स्वराज्यासाठी तिथून युक्तीने निसटून बाहेर आले. अशाच पद्धतीने एकनाथ शिंदे यांना रोखण्याचे भरपूर प्रयत्न झाले; पण तरीही ते महाराष्ट्रासाठी बाहेर पडले, असे अकलेचे तारे मंगलप्रभात लोढा यांनी तोडले. शिवाय औरंगजेबाने शिवरायांना पकडून आग्र्याला नेल्याचे भयंकर वक्तव्य करून ऐतिहासिक संदर्भ व इतिहासाचे पावित्र्य लोढा यांनी पायदळी तुडवले. त्यामुळे पुन्हा सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.

पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री झालेल्यांची महाराजांशी तुलना सहन करणार नाही – आनंद परांजपे

छत्रपती शिवाजी महाराज यांनी आग्रा येथून स्वतःची सुटका करून रयतेचे राज्य स्थापन केले होते. पण त्यांनी कधीच आपल्या सहकाऱयांच्या पाठीत खंजीर खुपसला नव्हता. त्यामुळे हिंदुत्व आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री झालेल्यांची तुलना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली जात असेल तर ते महाराष्ट्र सहन करणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला आहे.

वादग्रस्त विधानामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळल्यावर मंगलप्रभात लोढा चांगलेच गांगरून गेल्याचे दिसले. आपण तुलना केली नाही, तर फक्त शिवरायांचे उदाहरण दिले, असे म्हणत लोढा यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.