पहिल्याच पावसात मंगळवेढा पालिकेचे पितळ उघडे; गटारी तुंबल्या, नागरिक, व्यावसायिकांचे हाल

मंगळवेढा शहरात मृग नक्षत्राच्या झालेल्या पहिल्या पावसाने पालिका प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे. पावसाळापूर्व कामे झाली नसल्यामुळे पहिल्याच पावसात शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले. गटारी तुंबल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले. जुन्या मंडईत गटार तुंबल्याने गटारीचे पाणी छोटय़ा व्यावसायिकांच्या दुकानात शिरले. त्यामुळे बाजार असतानाही व्यवसाय करता न आल्याने नगरपालिकेच्या कामकाजाबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

मंगळवेढा शहरात मृग नक्षत्र निघण्यापूर्वी शहरातील गटारींची स्वच्छता युद्ध पातळीवर होणे अपेक्षित होते. मात्र, हे काम वरवरचे झाल्यामुळे अनेक ठिकाणी पावसामुळे गटारी तुंबल्याने घाण पाणी रस्त्यावर साचून राहिले. त्याचा नागरिकांना त्रास सोसावा लागतो आहे. गटारींच्या पाईपमध्ये प्लॅस्टिक व इतर कचरा अडकल्याने पाणी जाण्यास अडथळे निर्माण होत असल्याने ते पाणी तुंबून रस्त्यावर येऊ पाहत आहे. स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱयांनी हे काम काळजीपूर्वक केल्यास नागरिकांना याचा त्रास झाला नसता, अशी प्रतिक्रिया शहरवासीयांमधून उमटत आहे.

नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱयांनी कार्यभार घेतल्यापासून म्हणावी तशी कामात चुणूक दाखवली नसल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. सध्या नगरपालिकेचा कारभार प्रांताधिकारी बी. आर. माळी यांच्या नियंत्रणाखाली असून, त्यांनीच गांभीर्यपूर्वक लक्ष घालून भविष्यात नागरिकांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी होत आहे. शहरामध्ये अनेक ठिकाणी रस्ते उखडल्याने त्याकडेही मुख्याधिकाऱयांचे दुर्लक्ष होत आहे.

मंगळवेढा ही संतांची भूमी असून, राज्यातील अनेक वारकरी येथे दर्शनासाठी येतात. नुकतीच आषाढी वारी तोंडावर आल्याने गजानन महाराज पालखी व कर्नाटकातील पालख्या येथे येणार असल्याने याची खबरदारी घेऊन शहर स्वच्छ व सुंदर राहावे या दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत, अशा भावना व्यक्त होत आहेत.

रविवारी संध्याकाळी मृग नक्षत्राच्या पडलेल्या पावसामुळे जुन्या मंडईत पाणी साचल्याने व्यावसायिकांचे पुरे हाल झाले. पावसाच्या पाण्याचा लोंढा अधिक पाणी तुंबून छोटय़ा व्यावसायिकांच्या दुकानासमोर साचून राहिला. आज दिवसभर आठवडा बाजार असताना दुकानदारांना घाण पाण्यामुळे आपली दुकाने उघडता न आल्याने आर्थिक फटका बसला आहे. भविष्यात यापुढे असा प्रकार घडू नये, यासाठी नगरपालिका प्रशासनाने शहरात सर्वत्र खबरदारी घ्यावी, असे शहरवासीय व्यावसायिकांतून मागणी होत आहे.