
‘अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त.. स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात’ कविवर्य कुसुमाग्रजांनी व्यक्त केलेली खंत तंतोतंत खरी ठरली आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या घरादारांवर तुळशीपत्र ठेवून माणगाव तालुका व परिसरातील ७० हून अधिक स्वातंत्र्यसैनिकांनी आपले योगदान दिले. पण आज त्यांच्या स्मारकाची अत्यंत दुर्दशा झाली आहे. हे स्मारक धूळखात पडून असून आजूबाजूला गवताचे साम्राज्य पसरले आहे. एवढेच नव्हे तर या स्वातंत्र्यसैनिकांची नावेदेखील स्मारकावून पुसली गेली असून प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने माणगाववासीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
रायगड ही शौर्याची भूमी म्हणून ओळखली जाते. १९४७ साली तसेच गोवा मुक्तिसंग्रामामध्येही येथील देशभक्त स्वातंत्र्यसैनिकांनी प्रत्यक्ष भाग घेतला होता. नव्या पिढीला त्यांची आठवण राहावी यासाठी काही वर्षांपूर्वी माणगाव येथील जुन्या पंचायत समितीच्या आवारात मध्यवर्ती ठिकाणी भव्य स्मारक उभारण्यात आले होते. मात्र सध्या या स्मारकाची अत्यंत दयनीय झाली आहे.
माणगावसह गोरेगाव, मोरबा, निजामपूर, खरवली, तळा, महागाव अशा विविध गावांमधून स्वातंत्र्यपूर्व काळात देशभक्तीने प्रेरीत झालेल्या असंख्य तरुणांनी लढ्यामध्ये सहभाग घेतला. त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. देशासाठी हालअपेष्टा सहन केल्या. पण त्यांच्या स्मारकाकडे ढुंकूनही बघायला स्थानिक प्रशासनाला वेळ नाही. या स्मारकाच्या अवतीभोवती स्वच्छतेचा अभाव असून धुळीच्या जाड थराखाली स्वातंत्र्यसैनिकांची नावे अदृश्य झाली आहेत.
तातडीने नूतनीकरण करा
माणगावमधील या ऐतिहासिक स्मारकाचे तातडीने नूतनीकरण करावे. तसेच त्याच्या संरक्षणाची व्यवस्था करावी. या मागणीसाठी स्थानिक समाजसेवकांनी अनेकदा प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला. लोकप्रतिनिधींनी तरी या स्मारकाला पूर्वीचे स्वरूप देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा माणगावमधील देशभक्त बांधवांनी व्यक्त केली आहे.

























































