
मणिपूर येथे पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. या हिंसाचारात एका पोलीस कर्मचाऱ्यासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर 12 जण जखमी झाले आहेत. गेल्या महिन्यात उसळलेल्या हिंसाचारात 70 जणांचा मृत्यू झाला होता. रविवारी मणिपूरच्या वेगवेगळ्या भागात गोळीबार आणि हिंसाचारात तसंच चकमकीच्या विविध घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आणि 12 जण जखमी झाले. त्याखेरीज एका पोलीस कर्मचाऱ्याचाही मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
इन्फाळच्या पश्चिम भागातील फयेंग येथे झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला तर एक जखमी झाला. तर सुगनू भागात झालेल्या गोळीबारात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर अन्य एक जण जखमी झाला. सुगनू येथे सहा आणि सेरौ येथे चार जण जखमी झाले.
मणिपूर येथील हिंसाचाराची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली असून 17 मे रोजी सुनावणी झाली होती. सध्या न्यायालयाला उन्हाळी सुट्टी आहे. जुलैमध्ये पुन्हा सुनावणी होणार आहे. हिंसाचार पसरलेल्या भागातील लोकांना मदत करा, सुरक्षा द्या, पुनर्वसन या मुद्दय़ावर राज्याकडून न्यायालयाने अहवाल मागविला आहे.