
लातूर जिल्ह्यात धनेगाव शिवारातील मांजरा नदीच्या पात्रामध्ये एका सुटकेसमध्ये अनोळखी तरुणीचा मृतदेह सापडला आहे. खून करून मृतदेह सुटकेसमध्ये घालून ती सुटकेस नदीपात्रात फेकून दिल्याचा संशय व्यक्त जात आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.
सदर घटनेबाबत अधिक माहिती अशी की, धनेगाव येथील संतोष बेंबडे यांना सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास नदीच्या पात्रामध्ये एक सुटकेस निदर्शनास आली.त्यांच्या सोबत गोविंद इंगळे, रमन कापसे, पोलीस पाटील संगीत कापसे यांनी गावातील अन्य काहीजणांच्या मदतीने ती सुटकेस पाण्यातून ओढून बाहेर काढली. मात्र त्यामधून रक्त बाहेर येत असल्याचे पाहून त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात माहिती कळवली. पोलिसांनी सुटकेस उघडी केली असता त्यामध्ये अनोळखी तरुणीचा मृतदेह असल्याचे निदर्शनास आले.
मयत तरुणीवर बलात्कारानंतर निर्घृणपणे खून करून मृतदेह सुटकेसमध्ये कोंबला आणि ती सुटकेस नदीच्या पात्रात फेकून दिल्याचा संशय पोलिसांना आहे. दरम्यान रविवारी रात्री एका इनोव्हा कारमधून ती सुटकेस नदीपात्रात फेकून दिली असल्याचेही काही जणांचे म्हणणे आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.



























































