मनमाडकरांच्या घरात ठणठणाट; लाखो लिटर पाणी वाया

963

पाणीटंचाईने होरपळणाऱया मनमाडकरांना परतीच्या पावसाने दिलासा दिला असला तरी मानवनिर्मित चुकांमुळे पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शहरातील नागरिकांच्या घराघरात पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट असताना लाखो लिटर पाणी वाया जाताना दिसत आहे. निसर्गाने भरभरून पाण्याचे माप मनमाडकरांच्या पदरात घातले, मात्र त्यांची घागरच रिकामी राहत असल्याने चीड निर्माण होत आहे.

परतीच्या पावसाने शहर व परिसरात धुमाकूळ घातला आहे. पर्यायाने पांझण नदीवरील वागदर्डी धरण तसेच रागुळणा नदीवरील रेल्वेचा महादेव बंधारा ओव्हरफ्लो  होऊन वहात आहेत. त्यातून दररोज लक्षावधी लिटर पाणी मनमाड  शहरातून अक्षरशः वाहून जात  आहे.

पांझण व रामगुळणा नद्यांचा उगम  पश्चिमेकडे असून पूर्वेकडे वाहत जाणाऱया या नद्यांचे पाणी अडविण्यासाठी मनमाड  शहर किंवा त्याच्या पूर्व बाजूला वाया जाणारे पाणी साठविण्याची कोणतीही यंत्रणा नसल्यानेच ही वेळ मनमाडकरांवर आली आहे.

गेल्या तीन दिवसांपूर्वी शहरात सुमारे 5 तासांत 135 विक्रमी  विक्री पाऊस होऊन या दोन्ही नद्यांना महापूर आला. गेल्या 24 वर्षांत पहिल्यांदाच एवढे पाणी या दोन्ही नद्यांना एकाचवेळी मनमाडकरांना पहायला मिळाले. पावसाने मनमाडकरांना धो धो धुतले. त्याचप्रमाणे या दोन्ही नद्यांतून आलेले लक्षावधी लिटर पाणी  वाहून गेले.

मनमाड  शहराच्या दत्तमंदिर रोडवर पांझण व रामगुळणा या नद्यांचा संगम  आहे. या नद्यांवरील महादेव बंधारा व वाघदर्डी धरण भरल्यानंतर ओव्हरफ्लोचे पाणी वाहून जात आहे. हा पूर पाण्याचा वाहून जाण्याचा फ्लो  कायम  आहे. त्याला कोठेही अटकाव बसलेला नाही.

गेल्या 10-11 महिन्यांपासून सातत्याने पालखेडच्या रोटेशनची चातकाप्रमाणे वाट पहाणाऱया मनमाडकरांना आज मात्र पाटोदा येथील साठवणूक तलाव, वागदर्डी धरण, रेल्वेचा महादेव बंधारा हे मनमाड  शहरासाठीचे सर्व जलसाठे भरभरून वाहत असले तरी प्रत्येकाच्या घरात मात्र पाणीटंचाईची परिस्थिती जैसे थेच आहे. आजही 15 दिवसाआड फक्त  एक वेळ एक तास नगरपालिका नळाद्वारे पाणीपुरवठा करीत आहे.

उपलब्ध पाण्याचा आढावा घेऊन शहराला लवकरच पुढील काही महिन्यांसाठी आठ दिवसांआड एकवेळ पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे- डॉ.दिलीप मेनकर,मुख्याधिकारी, न.पा.

मनमाड  शहराच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहून जाणाऱया पांझण नदीतील साठय़ासाठी या पुढील काळात ठोस उपाययोजना करून योग्य प्रकल्प राबविण्यात येईल.- आमदार सुहास कांदे

बाहेर धो धो पाऊस बाजूला नदीतून वाया जात असलेले पाणी, परंतु घरांत मात्र पाण्याच्या टाक्या, हंडा, कळशी रिकामी असे आमच्या घरांतील ऐन दिवाळीत चित्र होते. किमान यापुढील काळात तरी पालिकेने किमान सात दिवसांआड पाणीपुरवठा करावा. – माधुरी कदम, गृहिणी

 

आपली प्रतिक्रिया द्या