राहुल,प्रियांकाऐवजी ‘या’ नेत्याकडे द्या काँग्रेसचे नेतृत्व; सर्वेक्षणातील निष्कर्ष

देशातील सर्वात जुना पक्ष असलेला काँग्रेस सध्या पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मेहनत घेत आहे. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकानंतर काँग्रेसला स्थायी अध्यक्ष मिळालेला नाही. पक्षाच्या नेतृत्वावरून पक्षात दोन गट निर्माण झाले आहेत. राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे, असे एका गटाचे म्हणणे आहे. तर गांधी परिवारा व्यतिरिक्त इतर नेत्याकडे अध्यक्षपद द्यावे, अशी मागणी दुसऱ्या गटाने केली आहे.

आजतक-कार्वी इनसाइट्स लिमिटेडने केलेल्या एका सर्वेक्षणात गांधी परिवाराची लोकप्रियता कमी झाल्याचे दिसून आले आहे. तसेच प्रियांका गांधी किंवा राहुल गांधी यांच्याऐवजी इतर नेत्याकडे पक्षाची धुरा दिल्यास पक्षाला बळकटी येईल, असे मत अनेकांनी नोंदवले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवल्यास पक्षाला नवचैतन्य येईल, असे अनेकांनी सांगितले. पक्षाच्या अध्यक्षपदासाठी 27 टक्के लोकांनी मनमोहन सिंग यांच्या नावाला पसंती दिली आहे. काँग्रेस नेतृत्वासाठी ते योग्य व्यक्ती आहेत, असे मत व्यक्त करण्यात आले आहे.

या सर्वेक्षणात राहुल गांधी यांनी पक्षाचे नेतृत्व करावे, असे 15 टक्के लोकांनी म्हटले आहे. ऑगस्ट 2020 मध्ये राहुल यांची लोकप्रियता वाढली होती. त्यावेळी 23 टक्के लोकांनी राहुल यांनी पक्षाचे नेतृत्व करावे, असे मत व्यक्त केले होते. मात्र, आता त्यांच्या लोकप्रियतेत घट झाल्याचे सर्वेक्षणातून दिसून येत आहे. त्यामुळे राहुल यांच्या ऐवजी मनमोहन सिंग यांच्याकडे पक्षाची धुरा देण्याकडे अनेकांचा कल असल्याचे दिसून आले.

काँग्रेस अध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, ते राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार नसल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच सर्वेक्षणात 12 टक्के लोकांनी राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट अध्यक्षपदासाठी योग्य व्यक्ती असल्याचे म्हटले आहे. तरुणांना पक्षाचे नेतृत्व दिल्यास पक्षाला बळकटी येईल, असे या लोकांचे मत आहे. तर 10 टक्के लोकांनी अध्यक्षपदासाठी प्रियांका गांधी यांच्या नावाला पसंती दिली आहे. त्याचप्रमाणे 10 टक्के लोकांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्ष असलेल्या सोनिया गांधी यांनीच स्थायी अध्यक्ष बनावे, असे मत व्यक्त केले आहे.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि पक्षाचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व द्यावे, असे मत 5 टक्के लोकांनी व्यक्त केले आहे. या सर्वेक्षणात गांधी परिवाराव्यतिरिक्त इतर नेत्याला नेतृत्त्व देण्याकडे लोकांचा कल दिसून आला आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत अध्यक्षपदासाठी मे महिन्यात निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात काँग्रेस अध्यक्षपदाच्या चर्चा रंगल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या