काँग्रेस कार्यकर्ता मनोज दुबेच्या हत्येसाठी हत्यार पुरविणाऱ्या दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
manoj-dubey-congress

सामना ऑनलाईन,मुंबई

काँग्रेस कार्यकर्ता मनोज दुबे याच्या हत्येप्रकरणी साकीनाका पोलिसांनी आज आणखी दोघांना अटक केली. राहुल शर्मा (23) आणि सर्वेश सिंग (28) अशी त्या दोघांची नावे आहेत. मनोजच्या हत्येचा कट रचण्याबरोबर मुख्य आरोपींना हत्यार पुरविण्याचे काम या दोघांनी केले होते.

रविवारी मध्यरात्री असल्फा व्हिलेज येथील माहेश्वरी महाकाली मंदिराजवळ मनोज दुबे याची भररस्त्यात चाकू, तलवारीने वार करून हत्या करण्यात आली होती. हत्या करून पळून गेलेल्या भाजप कार्यकर्ते जीतेंद्र मिश्रा आणि उमेश सिंह या दोघांना एसीपी मिलिंद खेतले, साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील माने, कलिम शेख, अरविंदकुमार शिर्प, एपीआय रौफ शेख, उपनिरीक्षक संदीप साळुंखे, पवार, अभिषेक पाटील व पथकाने इगतपुरी येथे पकडले होते. त्यानंतर पोलिसांनी आज राहुल आणि सर्वेशला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत दोघांनी मनोजच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचे व उमेश आणि जीतेंद्रला हत्यार पुरविल्याची कबुली दिली. त्यामुळे दोघांना कलम 302, 120 ब व हत्यार कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली.

राहुलसोबत चॅटयुद्ध रंगले होते

मनोज आणि राहुलमध्ये फेसबुकवर चॅटयुद्ध रंगले होते. शिवाय मनोज त्यांना डोईजड झाला होता. त्यामुळे राहुल, सर्वेश, उमेश आणि जीतेंद्र यांनी रविवारी सायंकाळी मनोजचा काटा काढायचा कट रचला होता. त्यासाठी राहुलने चाकू तर सर्वेशने तलवारी उपलब्ध करून दिल्या होत्या. राहुल इंजिनीयर असून सर्वेसचे बिझनेस असल्याचे साकीनाका पोलिसांनी सांगितले.