मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीत शनिवारपासून पुन्हा एल्गार करण्यात येणार आहे. पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली असली तरी आपण उपोषणाला बसणार असल्याचा ठाम निर्धार मनोज जरांगे-पाटील यांनी व्यक्त केला. कोणत्याही परिस्थितीत उपोषणाचा निर्णय मागे घेणार नसल्याचेही जरांगे यांनी स्पष्ट केले.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी 4 जून रोजीच मनोज जरांगे उपोषणाला बसणार होते. मात्र आंतरवालीच्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱयांची भेट घेऊन जातीय सलोखा बिघडत असल्यामुळे उपोषणाला परवानगी देऊ नये, असे निवेदन दिले होते. त्यानंतर पोलिसांनी आचारसंहिता सुरू असल्याच्या कारणावरून उपोषणाला परवानगी नाकारली. त्या वेळी जरांगे यांनी आचारसंहितेचा आदर करत 8 जून रोजी उपोषण सुरू करणार असल्याचे सांगितले होते.
गोळय़ा घाला, लाठय़ा चालवा… उपोषण होणारच!
मराठा आरक्षणासाठी करण्यात येणाऱया उपोषणाची रीतसर परवानगी तहसीलदारांकडे मागण्यात आली आहे. परवानगी मिळो न मिळो, माझे उपोषण शनिवारी सकाळी 10 वाजता सुरू होणारच, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले. सरकारने गोळय़ा घातल्या, लाठय़ा चालवल्या, अटक केली तरीही या निर्णयात बदल होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. घटनेने मला आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे, असेही ते म्हणाले. उपोषणाला परवानगी नाकारून मला कारागृहात टाकण्याचा गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.
‘माधव’ पॅटर्न तुम्ही आणता आणि जातीयवादी मला म्हणता!
मनोज जरांगे यांनी आज अप्रत्यक्षपणे भाजपवर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकीत मराठय़ांनी आपली ताकद दाखवली म्हणून मला जातीयवादी ठरवणाऱयांनी 20 वर्षांपूर्वी ‘माधव’ पॅटर्न कुणी आणला हे सांगावे, असा प्रतिहल्ला केला. मराठय़ांनी शांततेत क्रांतीमोर्चे काढले, त्याला प्रतिमोर्चे काढून कोणी आव्हान दिले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पोलिसांनी परवानगी नाकारली
मनोज जरांगे यांच्या शनिवारपासून आंतरवाली सराटीत सुरू होणाऱया उपोषणाला पोलीस प्रशासनाने वेगवेगळय़ा कारणांसाठी परवानगी नाकारली आहे. आंतरवाली सराटीतील ग्रामस्थांनी केलेला विरोध, जातीय सलोखा बिघडल्याचे ग्रामस्थांनी दिलेले कारण तसेच ग्रामसभेची परवानगी नसल्यामुळे या उपोषणाला परवानगी देता येणार नसल्याचे पत्र गोंदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ए.एस. खांडेकर यांनी मनोज जरांगे यांना दिले आहे. आपल्याकडून कोणतेही नियमबाहय़ कृत्य होणार नाही, अशी अपेक्षाही पोलिसांनी जरांगे यांच्याकडून व्यक्त केली आहे.