सरकार आरक्षण द्यायला तयार नाही, त्यामुळे आता रग आणि धग दाखवायची वेळ आली आहे. आत्तापर्यंत आपण पक्ष आणि नेत्यांना मोठे केले. आता तुमची लढाई तुम्हाला अंगावर घ्यावी लागेल. त्यासाठी मराठा समाजाचे एकास-एक उमेदवार देऊन 288 आमदार पाडू. यासाठी पक्ष आणि नेत्याला बाजूला ठेवून जातीसाठी एकजूट दाखवा, असे आवाहन करत ‘तातडीने आरक्षण द्या, अन्यथा सत्तेत घुसून घेऊ’, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिला.
सांगलीतील राम मंदिर चौकात मनोज जरांगे यांची जाहीर सभा झाली. तत्पूर्वी विश्रामबाग ते राम मंदिर चौक अशी शांतता रॅली काढण्यात आली. रॅली आणि सभेला जिह्यातील मराठा समाजाचे हजारो बांधव सहभागी होते.
जरांगे-पाटील म्हणाले, ‘अर्धे पक्षच बंद करायची वेळ आली आहे. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही. आरक्षण म्हणजे यांच्या बापाची जहागिरी नाही. मराठा समाजातील लेकरं मोठी करण्यासाठी माझा संघर्ष आहे. यांना फक्त त्यांचे पक्ष आणि त्यांची मुले मोठी करायची आहेत. त्यांनी पक्ष मोठे केले, मुले मोठी केली. मात्र, आरक्षणाबाबत कोणी बोलत नाही. आम्हाला राजकारणात जायचे नाही. मात्र, आरक्षण दिले नाही तर आम्हाला दुसरा पर्याय नाही. आम्ही त्यांच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ’, असा इशारा जरांगे-पाटील यांनी दिला.
जागे राहा, आरक्षण घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आपल्या मागे सरकार नाही. आपला क्षत्रियांचा धर्म आहे, त्यामुळे विजय झाल्याशिवाय मागे फिरायचे नाही. लढाई जिंकायची आणि विजयाचा टिळा लावूनच मागे यायचं. पुढच्याची जिरवल्याशिवाय मागे फिरायचे नाही. आता या नेत्यांची मुले नव्हे; तर सामान्य मराठा कुटुंबातील मुलगा आमदार होईल, असे जरांगे-पाटील यांनी सांगितले.
सांगली, कोल्हापुरातील पूरग्रस्त शेतकऱयांना भरपाई द्या
सांगली, कोल्हापुरात पूर आल्याने शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी विनंती जरांगे-पाटील यांनी मुख्यमंत्री आणि सरकारला केली. शेतकऱयांचा बांध फुटू देऊ नका. आंदोलन संपू द्या; अलमट्टी धरणावर आपण जाऊ. पाणी साठवतायत ते आणि येथे आमच्या डोक्याला ताप झालाय. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पूर येतोय. आता आम्हाला अलमट्टीकडे बघायचंय. मी धरणाचा विषय काढला की, आता माझ्याकडे जलतज्ञ येणारच, असेही जरांगे यांनी सांगितले.