मराठा समाजाच्या आरक्षणासाठी चौदा महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची कोणी दखल घेत नाही. जेव्हा जेव्हा अन्याय होतो, तेव्हा उठाव करावा लागतो. देवदूतांनाही उठाव करावा लागला. छत्रपती शिवरायांनीदेखील उठाव केला होता. त्यामुळे आम्हालाही उठाव करावा लागतोय.
17 जातींचा ओबीसीत समावेश झाला, तेव्हा त्यांच्या आरक्षणाला धक्का लागला नाही का? मराठा समाजाला ओबीसीत घ्यायचे म्हटले की धक्का लागतो, असा सवाल उपस्थित करून आता उलथापालथ करावीच लागेल, असा एल्गार मनोज जरांगे पाटील यांनी नारायणगडावरील दसरा मेळाव्यात बोलताना केला. नारायणगडावरील दसरा मेळावा हाऊसफुल झाला होता. संपूर्ण राज्यातून मराठा बांधव दाखल झाले होते.
नारायणगडावरील आजच्या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. मनोज जरांगे पाटील काय बोलतात, याची उत्सुकता लागली होती. 900 एकरवरील हा मेळावा खऱ्या अर्थाने चर्चेत होता. जरांगे पाटील यांचे सजवलेल्या रथावरून व्यासपीठावर आगमन झाले. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले, आमच्या बापाच्या डोळ्यात येणारं पाणी आम्हाला बघवत नाही. मी जीवंत असेपर्यंत मला त्यांच्या डोळ्यातलं पाणी बघवत नाही.
आता झुकायचं नाही, कोणते पाप करायचे नाही, कोणावर अन्याय करायचा नाही. पण स्वरक्षण करण्यासाठी कमी पडायचे नाही. मी अनेकदा विचारतोय, आमचा दोष काय, उत्तर कोणीच देत नाही. आपले सोन्यासारखे लोपं वाचवा, समाज वाचवा. मराठा समाजाच्या लेकरांना मान खाली घालावी लागेल असं वागू नका, तुमचे लेकरं अधिकारी बनलेले बघायचे आहेत. अन्याय सहन करायचा नाही.
न्यायासाठी कठोर आंदोलन सुरू ठेवायचे. इथे जातीचा संबंध नाही. प्रत्येक जात केंद्र आणि राज्याच्या सुविधा घेते, तो जातीवाद नाही का? मग आम्ही पण आमच्या सुविधाच मागत आहोत, असे म्हणत जरांगे पाटील पुढे म्हणाले, मला संपवण्यासाठी अनेक षड्यंत्र रचले गेले. मला होणाऱ्या वेदना मी चेहऱ्यावर कधीच आणत नाही. मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत होतोय. आता उलथापालथ करावीच लागेल, असे आवाहनही त्यांनी उपस्थित जनसमुदायाला मेळाव्याच्या माध्यमातून केले.
आचारसंहिता लागल्यानंतर भूमिका जाहीर करणार
तुमच्या सर्वांच्या मनात जे आहे तेच मी करणार आहे. मी एवढंच सांगतो. आचारसंहिता लागल्यानंतर मी तुम्हाला आपली मुख्य भूमिका सांगणार आहे. मात्र, आचारसंहिता लागेपर्यंत आपल्याला धीर धरायचा आहे, असे आवाहन जरांगे यांनी केले. सरकारची आता सुटका नाही, असा इशारा देतानाच तुमची शान वाढवणार, तुम्हाला हवं तेच मी करणार, असे आश्वासन जरांगे यांनी समाजाला दिले.
सकाळपासूनच राज्यभरातील मराठा बांधव नारायणगडच्या दिशेने येत होते. दहा किलोमीटरपर्यंत रांगा लागलेल्या होत्या. हजारो मराठा बांधव तिथपर्यंत पोहचूच शकले नाहीत. या मेळाव्यात येणाऱ्या प्रत्येक बांधवांची चहा-पाणी, खिचडी आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. मेळाव्याच्या व्यासपीठावर नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज उपस्थित होते.