मनसुख हिरेन मृत्यु प्रकरण – अज्ञाताविरोधात हत्येचा गुन्हा, मुंबई एटीएसचा कसून तपास सुरू

ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या गूढ मृत्यूप्रकरणी मुंबई एटीएसने आज हत्येचा गुन्हा दाखल केला. माझ्या पतीची हत्याच झाली आहे, अशी लेखी तक्रार हिरेन यांची पत्नी विमला यांनी केल्यानंतर एटीएस पथकाने त्यांच्या निवासस्थानी जाऊन चौकशी केली आणि सायंकाळी उशिरा गुन्हा रजिस्टर क्रमांक 12/2021 भादंवि कलम 302, 201, 34 आणि 120 ब नुसार मुंबईतील नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. त्यानंतर हिरेन कुटुंबीयांना पोलीस संरक्षणही देण्यात आले असून आता मनसुख यांची हत्या कोणी केली हे शोधण्याचे आव्हान एटीएससमोर उभे ठाकले आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराशेजारी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ ही ठाण्यातील मनसुख हिरेन यांची असल्याचे स्पष्ट झाले; परंतु त्यापूर्वीच मनसुख यांनी आपली स्कॉर्पिओ कार ऐरोली येथून चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. गुरुवारी अज्ञात इसमाचा पह्न आल्यानंतर त्याला भेटण्यासाठी गेलेले मनसुख यांचा मृतदेह शुक्रवारी सकाळी मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत सापडल्याने खळबळ उडाली. त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांच्या शरीरावर मारहाणीच्या कोणत्याही खुणा नाहीत, असा अहवाल डॉक्टरांनी दिला. मात्र त्यात मृत्यूचे कारण स्पष्टपणे नमूद करण्यात आले नव्हते. त्यामुळे मनसुख यांचा व्हिसेरा कलिना येथील फोरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला. मनसुख यांच्या कुटुंबीयांनी त्यांची हत्याच झाली असून त्याचा सखोल तपास करण्याची मागणी केली होती.

हत्या प्रकरणाचे नाटय़ रूपांतर करणार

शुक्रवारपासून रविवारपर्यंत एटीएसने दोन वेळा मुंब्रा खाडीत घटनास्थळी पाहणी केली. मृतदेह खाडीतून बाहेर काढण्याच्या प्रात्यक्षिकाचा व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याने नेमकी हत्या कशी झाली असावी याचा अंदाज घेण्यात आला. मृतदेह चिखलातून बाहेर काढण्यात आला. मग तो इतका चिखलात रुतलाच कसा, आदी प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी या प्रकरणाचे नाटय़ रूपांतर करण्याचा विचार एटीएस करीत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

एटीएसचा अॅक्शन प्लॅन; हिरेन कुटुंबाची साडेतीन तास चौकशी

राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास एटीएसकडे दिल्यानंतर एटीएसने अॅक्शन प्लॅन तयार केला. मुंबई एटीएसचे डीसीपी राजपुमार शिंदे यांच्या टीमने मुंब्रा खाडीत जाऊन आज घटनास्थळाची पुन्हा प्रत्यक्ष पाहणी केली आणि सर्व दस्तावेज मुंब्रा पोलीस आणि गुन्हे शाखेकडून ताब्यात घेतले. त्यानंतर डीसीपी राजपुमार शिंदे यांच्यासह एटीएसचे पथक हिरेन परिवाराच्या ठाण्यातील निवासस्थानी पोहोचले. त्यांनी मनसुख यांची पत्नी विमल, मुले आणि भाऊ यांच्याशी तब्बल साडेतीन तास संवाद साधून चौकशी केली. यावेळी हिरेन कुटुंबीयांनी मनसुख यांची आत्महत्या नाही तर हत्याच आहे, असे सांगत सखोल चौकशीची मागणी केली.

एटीएसच्या टीमने मनसुख यांचा गुरुवारी सकाळपासून ते संध्याकाळी पह्न येईपर्यंतचा संपूर्ण दिनक्रम विचारला. त्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास एटीएसचे पथक हिरेन यांच्या घरातून बाहेर पडले ते थेट मुंबईच्या नागपाडा येथील कार्यालयात गेले. त्यांच्यापाठोपाठ हिरेन यांचा मुलगा मीत हा आपल्या खासगी गाडीने एटीएस पथकाच्या नागपाडा येथील कार्यालयात पोहोचला. या घडामोडींनंतर सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एटीएसने अज्ञात आरोपीविरोधात नागपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला.

हिरेन यांच्या घरी जाणाऱया प्रत्येकाची चौकशी

मनसुख हिरेन यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार झाले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण दिले आहे. आंबेडकर रोड येथील विकास पाल्म सोसायटीचा ताबा पोलिसांनी घेतला असून हिरेन यांच्या निवासस्थानी जाणाऱया प्रत्येक माणसाची चौकशी करून त्याची नोंद घेतली जात आहे.

सीसीटीव्ही फुटेज तपासणार

एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपासात एटीएस हे मनसुख हिरेन यांच्या घरापासून ते शेवटपर्यंतचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. यामुळे मनसुख घरातून निघाल्यानंतर कुठल्या मार्गाने कुठे गेले हे ठिकठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजद्वारे स्पष्ट होणार आहे.

शेवटचे लोकेशन वसई-विरारचे

मनसुख हिरेन हे गुरुवारी रात्री 8.30च्या सुमारास घोडबंदर रोडवर पोलीस अधिकारी तावडे यांचा पह्न आल्यामुळे गेले. ते इमारतीतून बाहेर पडतानाचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले. मात्र पुढे काय झाले हे गुलदस्त्यातच आहे. मनसुख यांच्या मोबाईलचा तांत्रिक तपास केल्यानंतर शेवटचे लोकेशन वसई-विरार येथील मांडवीचे असल्याने एटीएसची यंत्रणा बुचकळय़ात पडली आहे. जर लोकेशन मांडवी असेल तर हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत पोहोचला कसा, याची उत्तरे एटीएसला शोधावी लागणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या