
मंत्रालयात आज दुसऱया मजल्यावर ऍण्टी करप्शन ब्युरोने कारवाई केली. एसीबीच्या पथकाने सापळा लावून अन्न व औषध प्रशासन विभागात कार्यरत कारकूनास लाच घेताना रंगेहाथ पकडले. राजेंद्र ढेरंगे असे कारकूनाचे नाव असल्याचे समजते. 35 हजार रुपयांची लाच घेताना ते ट्रप झाले.
याप्रकरणातील तक्रारदाराच्या मेडिकल दुकानाचा परवाना निलंबन करण्यात आला होता. निलंबनाची कारवाई रद्द होण्यासाठी ते खटपट करत होते. दरम्यान, निलंबन रद्द करून देतो असे म्हणत त्यासाठी राजेंद्र ढेरंगे यांनी 50 हजार रुपये लाच मागितली होती. परंतू लाच द्यायची नसल्याने तक्रारदाराने ऍण्टी करप्शन ब्युरो कडे धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार एसीबीने आज सापळा रचून ढेरंगे यांना 35 हजार घेताना रंगेहात पकडल्याचे सांगण्यात येते.
मंत्र्याला पदावरून हटवा -काँग्रेस
महाभ्रष्ट महायुती सरकारच्या कारकिर्दीत मंत्रालयात खुलेआम लाचखोरी सुरू आहे. जनतेची कामे पैशाशिवाय होत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रकरणाची दखल घेऊन जनतेला माहिती द्यावी आणि लाचखोर मंत्र्याला पदावरून हटवावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
























































