
सरकारी कार्यालयांपासून मंत्रालयातीत ‘मलईदार’ खात्यात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या सहसचिवांपासून क्लार्क व टायपिस्टच्या येत्या एप्रिल व मे महिन्यात होलसेल बदल्या होणार आहेत. एका विभागात सहा वर्षे पूर्ण झालेले अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहेत. मत्तेदारी संपुष्टात येण्याच्या भीतीमुळे अनेक अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.
शासकीय सेवेतील गृह, महसूल, नगरविकास, ग्रामविकास, जलसंपद, सार्वजनिक बांधकाम विभाग अशी मलईदार खाती म्हणून ओळखली जातात. सरकारी कर्मचाऱ्यांची दर तीन वर्षांनी बदली होते; पण काही कर्मचाऱ्यांनी अशा महत्त्वाच्या खात्यांमध्ये स्वतःची मत्तेदारी निर्माण केलेली आहे. अनेक मंत्र्यांनाही अशा अनुभवी अधिकाऱ्यांची गरज असते. कारण ‘प्रस्ताव फाईल’, ‘सुप्रमा’ याची या अधिकाऱ्यांना अचूक माहिती असते. ‘कामे कशी वाजवायची’ याचा सल्लाही अनेक अधिकारी मंत्र्यांना देत असतात. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांना हात लावला जात नाही. पण सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांनी बदल्यांच्या संदर्भात महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत.
आदेशात काय म्हटले आहे…
मागील अनेक वर्षांपासून असे निदर्शनास आले आहे की, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्यावर त्यांच्या बदलीस मुदतवाढ देण्याची मागणी किंवा बदली रद्द करण्याची मागणी संबंधित प्रशासकीय विभाग करतात. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बदली झालेल्या विभागाने रुजू होण्यासाठी कार्यमुक्त न केल्याने प्रशासकीय अडचणी निर्माण होतात.
कोणते अधिकारी, कर्मचारी रडारवर
सहसचिव, अवर सचिव, कक्ष अधिकारी, सहाय्यक कक्ष अधिकारी, लिपिक टंकलेखक व लघुलेखक संवर्गातील अधिकारी व कर्मचारी.
पर्यायी अधिकाऱ्यांची व्यवस्था
2026च्या सार्वत्रिक बदल्यांमध्ये संबंधित विभागातील अधिकारी-कर्मचारी पात्र आहेत त्यांची यादी करून त्यांच्या जागी पर्यायी कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्याची कार्यवाही आतापासूनच सुरू करावी. जेणेकरून बदली झालेले अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केल्यावर संबंधित विभागातील कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यास अडचणी निर्माण होणार नाहीत, असे अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी आदेशात नमूद केले आहे.




























































