‘गृह’चा ताण कमी करण्यासाठी मंत्रालयात योगाचे धडे, कार्यालयातील बसल्या जागेवरच सोपी योगासने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरकारी कामकाजात खास करून गृह विभागात कामकाज करताना कर्मचाऱयांवर प्रचंड ताण असतो. या ताणातून अनेक मानसिक व शारीरिक व्याधी जडतात. त्यामुळे यावर मात करण्यासाठी मंत्रालयातल्या दुसऱया मजल्यावरील गृह विभागाच्या कर्मचाऱयांसाठी बसल्या जागेवरच दुपारी चार वाजता दहा मिनिटांसाठी योगाचे सोपे धडे दिले जात आहेत. मंत्रालयाच्या संपूर्ण इमारतीमध्ये अशा प्रकारे योगाचे धडे राबवणारा गृह विभाग एकमेव विभाग ठरला आहे.

मुंबईतील धावपळीचे जीवन, व्यायामाचा अभाव, बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयी आणि तासन्तास कार्यालयातील कॉम्युटरवरचे काम यामुळे नोकरदारांना मानेपासून पाठ आणि पायाचे विकार जडतात. मंत्रालयातील कर्मचारीही अपवाद नाहीत. अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना विविध व्याधी जडल्या आहेत. त्यामुळे या सर्वांवर मात करण्यासाठी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव राधिका रस्तोगी यांनी पुढाकार घेतला आहे. दुसऱया मजल्यावरील गृह विभागातील कर्मचाऱयांसाठी दररोज दहा मिनिटांसाठी कार्यालयातील बसल्या जागेवरच अत्यंत सोप्या पद्धतीच्या योगासनांचे धडे दिले जात आहेत.

गृह विभागात रोज दुपारी चारच्या ठोक्याला योगासने सुरू होतात. मरीनलाइन्स येथील कैवल्यधामचे योगशिक्षक गृह विभागात येऊन अधिकारी-कर्मचाऱयांना योगसानांबाबत सूचना देतात. कर्मचारी बसल्या जागेवर बसून योगासने करतात. हात वर करा, उजव्या-डाव्या बाजूला वळा, अनुलोम-विलोम अशा सूचनांवर अधिकारी-कर्मचारी योगासने करतात. योग शिक्षकांच्या सूचना प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याला ऐकू जाव्यात यासाठी विभागात मध्यवर्ती ध्वनिक्षेपक यंत्रणा बसवण्यात आली आहे.