
महायुती सरकारमधील अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात तोडपाणी होत असल्याचे समोर आले आहे. मेडिकल स्टोअरच्या परवान्याचे निलंबन रद्द करण्यासाठी लाच घेताना झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी झडप घातली. त्या लिपिकाने झिरवाळांच्या खासगी सचिवाच्या सांगण्यावरून लाच घेतल्याची कबुली दिल्याने खळबळ उडाली आहे.
नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राजेंद्र ढेरंगे या लिपिकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले. ढेरंगे यांनी आपण झिरवाळ यांचे खासगी सचिव रामदास गाडे यांच्या सांगण्यावरून लाच घेतल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. त्यामुळे याप्रकरणी गाडे यांचीही चौकशी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस आयुक्त संदीप दिवाण, अपर पोलीस उपायुक्त अनिल घेरडीकर आणि राजेंद्र सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त मानसिंग पाटील आणि गंगाप्रसाद मुदीराज यांनी ही कारवाई केली.
भाजप महायुतीने मंत्रालयाचे भ्रष्टाचारालय केले आहे. झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाने वरिष्ठांच्या सांगण्यावरून लाच घेतल्याचे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱयांना सांगितल्याची माहिती समोर येत आहे, हे आणखी धक्कादायक आणि गंभीर आहे. त्यामुळे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱयांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे, असे सपकाळ म्हणाले.
माझा संबंध सिद्ध झाला तर राजीनामा देईन – झिरवाळ
नरहरी झिरवाळ यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली. या प्रकरणात माझा संबंध सिद्ध झाला तर तातडीने राजीनामा देईन, असे ते म्हणाले. मागील दोन दिवसांपासून आपण दिल्लीत आहे. घटना घडली ती अत्यंत चुकीची आहे. राजेंद्र ढेरंगे यांनी केलेल्या गैरप्रकाराला कुठेही पाठीशी घातले जाणार नाही, असे झिरवाळ म्हणाले. ढेरंगे याच्याबद्दल यापूर्वी कोणतीही तक्रार आली नव्हती. लाचेची रक्कम कितीही असो, सरकारी कर्मचाऱयाने पैसे घेणे चुकीचेच आहे. पैसे घेतले असतील तर त्याची शिक्षा त्याला भोगावीच लागेल, असे ते पुढे म्हणाले.
- ढेरंगे हा मूळचा अन्न व नागरी पुरवठा विभागाचा कर्मचारी असून सध्या त्याची नियुक्ती उसनवारी तत्त्वावर अन्न व औषध प्रशासनात लिपिक म्हणून होती. सुनावणीसंबंधी कागदपत्रांचे काम त्याच्याकडे होते.
काँग्रेसकडून झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी
मंत्रालयातील या लाचखोरी प्रकरणानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. या लाचखोरी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी नरहरी झिरवाळ यांनी तत्काळ आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.






























































