मनू हॅट्ट्रिक करणार, आणखी एक पदक खुणावतंय!

>> मंगेश वरवडेकर

एकीकडे हिंदुस्थानचे दिग्गज पदकाविना धारार्तीर्थी पडत असताना मनू भाकर एकटीच लढतेय आणि पदक जिंकतेय. आता तिने आपल्या आवडत्या 25 मीटर एअर पिस्टल प्रकाराच्या प्राथमिक फेरीत दुसरे स्थान पटकावत अंतिम फेरी गाठलीय. तिला आणखी एक पदक खुणावत असले तरी पॅरिस भूमीत ‘जन गण मन’चे सूर घुमवण्यासाठी सज्ज झाली आहे. शनिवारची दुपार हिंदुस्थानी क्रीडाप्रेमींसाठी सुवर्णमयी ठरू शकते.

 गुरुवारचा दिवस मऱ्हाटमोळय़ा स्वप्नील कुसाळेच्या कांस्यपदकाने संस्मरणीय ठरला. पण त्यानंतर बॅडमिंटनमध्ये पदकाची गॅरेंटी देणारे सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी-चिराग शेट्टी आणि सलग दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी पी. व्ही. सिंधू हरल्याने हिंदुस्थानी पथकाला मोठा धक्का बसला होता. मात्र आज शूटिंग स्टेडियममध्ये मनूच्या कामगिरीने हिंदुस्थानी चाहत्यांना गुरुवारचे अपयश विसरायला भाग पाडले. तिने प्रीसिजन स्टेजमध्ये 294 तर रॅपिड टप्प्यात 296 गुण मिळवत एकूण 590 गुण आपल्या नावावर नोंदवले. तिच्यापेक्षा पुढे असणाऱ्या हंगेरीच्या वेरोनिका मेजरने ऑलिम्पिक विक्रमाची बरोबरी करताना 592 गुण मिळवले. मनूचा हाच फॉर्म कायम राहिला तर मनू एकाच ऑलिम्पिकमध्ये तीन पदके जिंकणारी पहिली हिंदुस्थानी अॅथलीट असेलच, पण यावेळी तिचे लक्ष्य सोन्यावर आहे आणि इतिहास घडवणारी मनू आणखी एक ‘नेमपराक्रम’ आपल्या नावावर कोरण्यास सज्ज झालीय. मनू अंतिम फेरीत पोहोचली, मात्र इशा सिंगचे आव्हान साखळीतच संपले. तिला 18 वे स्थान मिळवता आले. तिने एकूण 581 गुण मिळवले. या प्रकारात 40 खेळाडूंचा सहभाग होता आणि त्यापैकी अव्वल आठ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले.

मनू इतिहासाच्या उंबरठय़ावर

मनूची प्रत्येक कामगिरी आता ऐतिहासिकच असेल. तिने दोन स्पर्धांत भाग घेतला आणि दोन्हीत कांस्य जिंकले आणि हिंदुस्थानच्या इतिहासातील सोनेरी पान लिहिले. गेल्या सव्वाशे वर्षांच्या इतिहासात दोन पदके जिंकणारी मनू भाकर ही पहिलीच हिंदुस्थानी ठरली आहे. आता ती तिसऱ्या पदकासमीप आहे आणि तिने पदकाची हॅटट्रिक केली तर हा हिंदुस्थानसाठी ‘न भूतो न भविष्यति’ असा इतिहास असेल. विशेष म्हणजे ऑलिम्पिकच्या इतिहास हिंदुस्थानच्या पथकानेच आतापर्यंत 2008 (3), 2012 (6) आणि 2020 (7) या तीन ऑलिम्पिकमध्ये तीन पदके जिंकली होती आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकर हा पराक्रम एकटीच रचण्याच्या उंबरठय़ावर आहे.