मानुष शाहचा क्वाद्री अरुणावर थरारक विजय, अल्टिमेट टेबल टेनिस 

उदयोन्मुख खेळाडू मानुष शाहने अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धेत गुरुवारी सनसनाटी विजय मिळवला. वडोदराच्या खेळाडूने अप्रितम खेळ करताना जागतिक क्रमवारीत 17व्या क्रमांकावरील क्वाद्री अरुणाचा पराभव केला. 

बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा सुरू आहे. यूमुंबा टीटीसाठी क्वाद्रीचा पराभव हा खूप मोठा धक्का ठरला. मानुष जागतिक क्रमवारीत 133व्या स्थानावर आहे, परंतु यंदाच्या पर्वात त्याने अप्रतिम खेळ करून दाखवला आहे. पुणेरी पलटन टेबल टेनिस फ्रेंचायझीच्या मानुषने 2-1 अशा फरकाने आज क्वाद्रीचा पराभव केला.   

राष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशनच्या (टीटीएफआय) मान्यतेखाली नीरज बजाज आणि विटा दाणी यांनी फ्रेंचायझीआधारित अल्टिमेट टेबल टेनिस लीगला प्रोत्साहन दिले आहे. 2017पासून सुरू झालेली लीग हिंदुस्थानातील टेबल टेनिससाठी गेम चेंजर ठरली आहे. 

पुणेरी फ्रेंचायझीच्या मानुषने आक्रमक खेळ करताना फोरहँडचे सुरेख फटके मारून क्वाद्रीविरुद्धचा पहिला गेम 11-7 असा जिंकला. त्यानंतर नायजेरियन खेळाडूने जबरदस्त पुनरागमन केले आणि 11-8 अशा विजयासह सामना 1-1 असा बरोबरीत आणला. या दोघांमधील रॅली पाहण्यासारखी होती. तिसऱया गेममध्ये हिंदुस्थानच्या युवा खेळाडूने उल्लेखनीय खेळ करून 11-8 अशी बाजी मारली.