जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत संततधार पाऊस आणि पुराच्या पाण्यामुळे वारणा आणि कृष्णा नदीकाठाला मोठा फटका बसला आहे. मिरज, वाळवा, शिराळा आणि पलूस या चार तालुक्यांतील 116 गावांतील 25 हजारांवर शेतकऱ्यांचे 9 हजार हेक्टरवरील जिरायती, बागायती आणि फळबागा पाण्यात गेल्या. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले असले, तरी अद्यापही वारणा आणि कृष्णाकाठावरील अनेक पिकांत पाणी साचलेले आहे. यामुळे पंचनामेच होत नसल्याने शेतकऱ्यांना मदत मिळणार कधी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सांगली जिह्यात जुलै महिन्यात धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीकाठची पिके पाण्याखाली गेली. मिरज, वाळवा, शिराळा आणि पलूस तालुक्यांतील वारणा, कृष्णा काठच्या 116 गावांना पुराचा तडाखा बसला.
कृष्णा आणि वारणाकाठावरील गावं पाण्याखाली गेली. सांगली शहरासह चार तालुक्यांतील साडेपाच हजार लोकांना स्थलांतरित व्हावे लागले. सहा हजार जनावरांनाही हलवावे लागले. ऊस, सोयाबीन, भुईमूग, केळी, द्राक्षांसह भाजीपाल्याचे नुकसान झाले. वारणा, कृष्णा नदीकाठावरील 25 हजार शेतकऱ्यांची 9 हजार हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेल्याचा अंदाज असून, पंचनामे संथगतीने सुरू आहेत.
शिराळा तालुक्यात सर्वाधिक नुकसान
मिरज तालुक्यातील 7 हजार 687 सुमारे 3 हजार 203 हेक्टरवरील नुकसान झाले आहे. वाळवा तालुक्यातील 1 हजार 606 शेतकऱ्यांचे 546 हेक्टर, शिराळ्यातील 9 हजार 439 शेतकऱ्यांचे 2 हजार 918 हेक्टर आणि पलूस तालुक्यातील 4 हजार 24 शेतकऱ्यांचे 1 हजार 889 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे.
नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे होणार – विवेक कुंभार
शासनाला प्राथमिक नुकसानीचा अहवाल पाठविला आहे. शेतात पाणी साचून राहिल्याने पंचनाम्यांना विलंब झाला. गेल्या दोन दिवसांपासून गतीने पंचनामे सुरू आहेत. नुकसान झालेल्या सर्वच शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. आठवडाभरात पंचनामे पूर्ण होण्याच्या आशा असून, त्यानंतर अंतिम अहवाल शासनाला पाठविण्यात येईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी सांगितले.