कोपरगाव शहर व तालुक्यात 13 गुन्हेगार तडीपार, 317 जणांवर तात्पुरती हद्दपारी

सामना प्रतिनिधी, कोपरगाव

आगामी शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टिकोनातून तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणाऱ्या तेरा सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी शहर, जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे. तर 317 जणांवर निवडणूक काळात तीन ते दहा दिवसांसाठी तात्पुरती हद्दपारी करण्यात आली आहे. मात्र त्यांना मतदानाच्या दिवशी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी एक तासाचा अवधी देण्यात येणार असल्याची माहिती कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अधिक देताना पोलीस निरीक्षक माणगावकर म्हणाले, कोपरगाव शहर पोलीस स्टेशन व कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने प्रतिबंधक कारवाईची माहिती माननीय पोलीस अधीक्षक इशू सिंधू, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार व उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने दोन किंवा त्याहून अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणाऱ्या आणि समाजात उपद्रव निर्माण करणाऱ्यांविरोधात तडीपारीची कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

पोलीस शहर व तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार दोन गँग मधील तेरा जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. या गुन्हेगारांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तडीपारीच्या प्रकरणांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र पोलीस कायदा कलमान्वये हे निर्देश दिले. तेरा जणांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात दोन किंवा अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणाऱ्यांविरोधात ही कारवाई केली जाणार आहे. शहर व तालुक्यात सीआरपीसी 107 अंतर्गत 528 जणांवर, सीआरपीसी 110 अंतर्गत 130 जणांवर, मुंबई पोलीस कायदा कलम 93 अन्वये 87 जणांवर, मुंबई पोलीस कायदा कलम 55 अंतर्गत 2 जणांवर, मुंबई पोलीस कायदा 56 अंतर्गत 11 जणांवर, सीआरपीसी 144 (3) अन्वये 216 जणांवर, सीआरपीसी 144 (2) अन्वये 101 जणांवर, तर सीआरपीसी 109 अन्वये 221 जणांवर, कारवाई करण्यात आली असून अनेकांकडून चांगल्या वर्तणुकीचे बाँड घेण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.

शिर्डी लोकसभा मतदार संघ अंतर्गत 219 कोपरगाव विधानसभा मतदार संघातील कोपरगाव शहर 49 इमारतीची 97 मतदान केंद्र, कोपरगाव तालुका 73 इमारतीत 116 मतदान केंद्र, शिर्डी -9 इमारतीत 17 मतदान केंद्र, राहता- 17 इमारतीत 23 मतदान केंद्र, श्रीरामपूर तालुका- 9 इमारतीत 17 मतदान केंद्र असे एकूण 157 इमारतीमध्ये 270 केंद्रे उभारण्यात आली आहेत. कोपरगाव शहर व तालुका संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आला आहे. मतदान प्रक्रिया शांततेने व व्यवस्थित पार पडावी यासाठी 500 पोलीस एस. आर. पी. यांची नेमणूक करण्यात आली आहे. गरज पडल्यास सीआरपी सुद्धा मागविण्यात येतील, अशीही माहिती पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी पत्रकारांना पत्रकार परिषदेत दिली. आतापर्यंत टाकळी नाका पुणतांबा फाटा या दोन वेगवेगळ्या ठिकाणी एसएससी पथकाच्या कारवाईत 4 लाखांपर्यंतची रोकड जप्त करण्यात आली आहे. असेही त्यांनी सांगितले