नोकरी नाही; खायचे वांदे! पाकिस्तानात दर तासाला एकाची आत्महत्या

134

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दहशतवादाला खतपाणी घालणाऱया पाकिस्तानातील लोकांचे खायचे वांदे झाले आहेत. नोकरी नाही त्यामुळे दोन वेळचे पोटभर जेवणही मिळू न शकणारे पाकिस्तानमधील 34 टक्के लोक डिप्रेशनखाली आहेत. एका रिपोर्टनुसार पाकिस्तानात दिवसाला 15 ते 35 लोक मृत्यूला कवटाळत आहेत. आर्थिक तंगीमुळे या देशात एका तासाला एकजण आत्महत्या करीत असल्याचे उघड झाले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या निष्कर्षानुसार 2012 मध्ये पाकिस्तानात आत्महत्येचा दर प्रति एक लाख लोकांमध्ये 13 हजार इतका होता. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये येथील ‘डॉन’ वृत्तपत्राने प्रकाशित केलेल्या एका सर्व्हेमध्ये 9 टक्के लोकांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगितले. तर 45 टक्के लोकांच्या म्हणण्यानुसार त्यांचे कुटुंब, मित्रमैत्रिणींपैकी कुणी आत्महत्या करण्याचा विचार बोलून दाखविला होता. आत्महत्येच्या घटनांमागे सामाजिक कारणे असल्याचे या सर्व्हेमध्ये म्हटले होते.

महागाई शिगेला; दहा रुपयाची चपाती 30 रुपयाला
पाकिस्तानात बेरोजगारीची स्थिती खूपच बिकट आहे. सध्याच्या घडीला बेरोजगारीचा दर 5.90 टक्के इतका आहे. येत्या काळात यात सुधारणा होण्याची शक्यतादेखील नाही. स्टेट बँक ऑफ पाकिस्ताननेही व्याजदर वाढवून तो 13.25 टक्के इतका केला आहे. तसेच पाकिस्तानातील रुपयामध्ये घट सुरूच असून एक अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपये 160 पर्यंत कोसळला आहे. महागाई तर शिगेला पोहोचली असून 10 ते 12 रुपयांत मिळणारी गव्हाची चपाती 20 ते 30 रुपयांवर पोहोचली आहे.

चारपैकी एकजण प्राथमिक शिक्षणही पूर्ण करीत नाही
शिक्षणाची स्थितीदेखील अत्यंत सुमार आहे. संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्टनुसार पाकिस्तानात 2030 पर्यंत चार विद्यार्थ्यांपैकी एकजण प्राथमिक शिक्षणही पूर्ण करू शकणार नाही. देशातील 50 टक्के तरुण उच्च माध्यमिक शिक्षणही पूर्ण करू शकत नाही.
पाकिस्तानातील गावांच्या तुलनेत आत्महत्येचे प्रमाण शहरात अधिक आहे.
कराचीत 35.7, क्वेटा 43 तर लाहोरमध्ये 53.4 टक्के लोक डिप्रेशनमध्ये आहेत.
संपूर्ण पाकिस्तानात 34 टक्के लोक तणावग्रस्त असून नोकरी न मिळणे, नोकरी सुटणे, पैसे नसणे ही त्यामागची मुख्य कारणे आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या