हातावर पोट असलेले कामगार सध्या महागाईने त्रस्त आहेत. तरीही महागाई कमी झाल्याचा दावा एनडीए सरकार करत आहे. मिळकत कमी आणि खर्चच जास्त अशी त्यांची स्थिती असून या कष्टकऱ्यांच्या नेमक्या काय समस्या आहेत. त्यांच्यासाठी ठोस कायदा करता येईल का? या अनुषंगाने काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी उबरने प्रवास केला. प्रवासादरम्यान उबरचालकाशी गप्पा मारल्या. चालकांची स्थिती काय आहे? घरखर्च भागतो का? त्यांना कोणत्या सुविधा हव्या आहेत? असे अनेक प्रश्न विचारून त्यांना नेमके काय हवे हे जाणून घेतले.
सुनील उपाध्याय या उबर कॅब चालकासोबत त्यांनी प्रवास केला. राहुल गांधी यांना पहाताच सुनील उपाध्याय आश्चर्यचकीत झाले. सुरुवातीला त्यांना विश्वासच बसत नव्हता ते राहुल यांच्यासोबत प्रवास करणार आहेत. अतिशय मनमोकळेपणाने त्यांनी राहुल यांच्यासोबत गप्पा मारल्या, त्यांच्या व्यथा सांगितल्या. हँड टू माऊथ इनकम म्हणजेच केवळ दोन वेळचे जेवण मिळते. मुलांच्या शिक्षणाचा खर्च, वीजबील, पाणीपट्टी, घरभाडे अशा अनेक पातळ्यांवर घरखर्च भागवताना तारेवरची कसरत होते, असे उपाध्याय यांनी सांगितले. काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये हातावर पोट असणारऱ्या कामगारांसाठी ठोस धोरण आखण्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी यावेळी दिले. दरम्यान, राहुल यांनी दुसऱ्या दिवशी उपाध्याय यांच्या कुटुंबाचीही भेट घेतली. त्यांच्यासोबत जेवण घेतले आणि त्यांच्याशी गप्पाही मारल्या.