‘मराठा स्वराज्य भवन’च्या जागेसाठी मराठा समाज आक्रमक, जागा लाटणाऱ्या महायुतीच्या आमदाराविरोधात आंदोलन; कोल्हापुरात तणाव

‘मराठा स्वराज्य भवन’साठी मागणी केलेली कोल्हापुरातील विश्वपंढरीसमोरील जागा हातकणंगलेच्या आमदारांनी महिला उद्योग संस्थेसाठी लाटल्याच्या निषेधार्थ मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्या जागेवर सकल मराठा समाजाने नियोजित ‘मराठा स्वराज्य भवन’चा डिजिटल बोर्ड लावला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

शिवाय या जागेवर मराठा समाजाने लावलेला ‘मराठा स्वराज्य भवन’ हा डिजिटल बोर्ड काढू नये, अन्यथा याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटतील. मराठा आरक्षणासाठी मुंबईत होणाऱ्या आंदोलनातदेखील हा विषय घेण्याचा इशारा देत, सरकारने या आंदोलनाला हलक्यात घेऊ नये. तत्काळ ‘मराठा स्वराज्य भवन’चा विषय मार्गी लावावा; अन्यथा येणाऱ्या कार्तिकी एकादशीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पंढरपूर बंद करण्याचा इशाराही यावेळी मराठा समाजाकडून देण्यात आला.

एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटल यांनी आंदोलन पुकारले असताना दुसरीकडे कोल्हापुरात ‘मराठा स्वराज्य भवन’च्या जागेसाठी मंगळवारी (२६ रोजी) सकल मराठा समाजाने आक्रमक होत आंदोलन केले. कोल्हापुरातील विश्वपंढरीसमोर असणारी सहा एकर जागा ‘मराठा स्वराज्य भवन’ला मिळावी, यासाठी गेल्या 11 वर्षांपासून
सकल मराठा समाजाचा लढा सुरू आहे. प्रशासकीय स्तरावर ताबाबाबतचा प्रस्ताव प्रलंबित असताना ही जाग हातकणंगलेचे जनसुराज्य पक्षाचे व भाजप समर्थक आमदार अशोक माने यांना महिला उद्योगसमूहासाठी देण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारकडून घेण्यात आला. त्यामुळे या जागेवर आमदार माने यांनी दावा न करता मराठा समाजासाठी द्यावी, अशी विनंती मराठा समाजाकडून करण्यात आली. याला प्रतिसाद न मिळाल्याने आता मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे.

या निषेधार्थ आज सकल मराठा समाजाने रस्त्यावर उतरून आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी सरकार आणि आमदार मानेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. तर, या जागेवर नियोजित ‘मराठा स्वराज्य भवन’ असा बोर्ड लावून दावा करण्यात आला.

आंदोलनात मराठा समाजाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड यांच्यासह शेकडो मराठा कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. दरम्यान, सरकारने तातडीने ही जागा ‘मराठा स्वराज्य भवन’ला द्यावी. शिवाय या जागेवर मराठा समाजाने लावलेला ‘मराठा स्वराज्य भवन’ डिजिटल बोर्ड काढू नये, अशीही मागणी करण्यात आली. यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुळीक, काँग्रेसचे सचिन चव्हाण, शशिकांत पाटील, उत्तम जाधव, उमेश पवार, शैलजा भोसले, संयोगिता देसाई, नीलम मोरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.