
सामना प्रतिनिधी । माजलगाव
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या समर्थनार्थ शुक्रवारी बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील तीर्थक्षेत्र पुरुषोत्तमपुरीत दहा तरुणांनी गोदावरी नदीपात्रात एक तास जल आंदोलन केले.
मराठा समाजास आरक्षण देण्यात यावे यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची धग आता ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातही पोहोचली आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तीर्थक्षेत्र पुरुषोत्तमपुरी येथील दहा मराठा तरुणांनी शुक्रवारी सकाळी १० वाजल्यापासून जल आंदोलनाला सुरुवात केली. गोदावरी नदीपात्रात जाऊन तरुणांनी घोषणाबाजी करत आरक्षणाची मागणी केली.
चार दिवसांपूर्वी अशाच आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे या तरुणाचा पाण्यात मृत्यू झाल्याची घटना घडल्याने पोलीस, महसूल प्रशासनाने खबरदारी घेत मोठा बंदोबस्त तैनात केला होता. पाण्यात होड्यांमध्ये पोलीस, दोर, जीवरक्षक आदी उपाययोजना करून सहायक पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार, तहसीलदार झम्पलवाड आंदोलनस्थळी उपस्थित होते. त्यांनी या आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. या आंदोलनात विजय दराडे, उमेश गोळेकर, रविराज पवार, परमेश्वर शेळके, दिनकर गोळेकर, गजानन गोळेकर, मुंजा धिरडे, दादा पवार,नंदू गोळेकर, पांडुरंग शेळके यांनी सहभाग घेतला . यावेळी बाजार समिती सभापती अशोक डक, जयदत्त नरवडे उपस्थित होते.




























































