मराठा आंदोलकांचा वाडय़ात ‘रास्ता रोको’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनीधी । वाडा

मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा या मागणीसाठी आज सकाळी वाडा तालुक्यातील खंडेश्वरी नाक्यावर रास्ता रोको करण्यात आला. भाजप सरकारविरोधात घोषणा देत आंदोलकांनी आपला संताप व्यक्त केला. या आंदोलनामुळे महामार्ग दोन तास ठप्प होता.

संपूर्ण राज्यभर असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाचे पडसाद आज वाडा तालुक्यातही उमटले. तुसे, उचाट, शिंदेवाडी, कोळकेवाडी, वरले, खैरे, वार्णोल, कुसवडे, नहिंबे येथून मोठय़ा संख्येने मराठा समाजबांधव आंदोलनासाठी आज रस्त्यावर उतरले. त्यात महिलांसह विद्यार्थीही सहभागी झाले होते. या आंदोलनासाठी मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

आंदोलन शांततेत

आजचा वाडय़ातील रास्ता रोको शांततेत पार पडला. कुणालाही त्रास होऊ नये याची काळजी सकाळपासूनच घेण्यात आली होती. दोन तास रास्ता रोको केल्यानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली होती. आरक्षण मिळेपर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.