मराठा आमदारांना काळे फासण्याचा मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

35

सामना प्रतिनिधी। लातूर

मराठा क्रांती मोर्चातर्फे ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ठिय्या आंदोलनात मराठा समाजातील आमदार-खासदारांनी सहभागी व्हावे, अन्यथा त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून शनिवारी झालेल्या ठिय्या आंदोलनातून देण्यात आला. शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याात आले. यावेळी आमदार काळे यांच्या नावाने आंदोलनकर्त्यांनी बोंब ठोकली. सकाळी १०.४५ वाजता ‘एक मराठा लाख मराठा’ अशी घोषणा देत, घंटानाद करून आंदोलन सुरू करण्यात आले.

आंदोलनाची पूर्वकल्पना असतानाही आमदार काळे हजर न राहिल्याने आंदोलकांनी त्यांचा निषेध केला. स्वकीयांच्या अशा भूमिकेने समाजाचे वाटोळे झाले असून अशा वृत्तीचे राजकारणी समाजाचे खरे शत्रू असल्याची भावना आंदोलकांनी यावेळी व्यक्त केली. आरक्षण मिळवून देण्यासाठी लागणारी इच्छाशक्तीही लोकप्रतिनिधींकडे नाही. हे आंदोलन त्यांचे नाही का, असा सवालही आंदोलनकर्त्यांनी केला. क्रांतीदिनी होणाऱ्या आंदोलनाने सरकारला धडकी भरावी यासाठी गावा-गावात, वाड्या वस्त्यांत संदेश पोहचवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. आरक्षण मिळेपर्यंत लढाई सुरूच राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या