
आम्हाला मुंबईत पाय ठेवू देणार नाही, उभे राहू देणार नाही. मराठे कसे मुंबईत येतात ते बघू, एक दिवसाची परवानगी, असे म्हटले होते. त्या रागाने फडणवीसांना ‘वर्षा’ बंगल्यात घुसून धुतलं असतं, असे धक्कादायक विधान मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केले आहे.
मी फक्त मराठय़ांचाच आहे. मी कुठल्याच राजकीय पक्षाला मोजत नाही. माझा समाज माझ्या पाठीशी आहे आणि मी त्यांच्या बरोबर. मी समाजाला रिझल्ट देतो. जीआर घेऊन येणार असे सांगितले होते आणि जीआर आणला. मी शब्द दिला होता मुंबईत जाणार आणि गेलो. फडणवीसांना घेरायचे असते तर मुंबईत गेल्या गेल्याच वर्षावर जाऊन सुरू केले असते, असेही मनोज जरांगे पत्रकार परिषदेत म्हणाले.
जीआरबद्दल संभ्रम निर्माण करणारे आधी कुठे होते?
माझा विषय आरक्षण आहे. त्यासाठी मी तुटून पडलेलो आहे. कुणी कितीही संभ्रम निर्माण केला, तरी माझा समाज कुणावर विश्वास ठेवत नाही. जे आता जीआरबद्दल संभ्रम निर्माण करत आहेत, हे आधी कुठे झोपले होते? बैठकीला बोलावल्यावर हे लोक येत नाहीत आणि मग कुरापती करतात, असा टोला जरांगे यांनी लगावला.
सातारा गॅझेटबाबत हयगय नको
मी मराठवाडय़ातील सगळा मराठा समाज आरक्षणात घालणार. थोड्याच दिवसात हे दिसेल. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा गॅझेटियरमध्ये सरकारने हयगय करता कामा नये. थोडय़ाच दिवसात ते मंजूर झाले नाही, तर मी पुन्हा तुमचे रस्त्यावर फिरणे बंद करीन, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
इतर समाजासाठीही समित्या स्थापन करा
ओबीसींसाठी स्थापन केलेल्या उपसमितीला आपला विरोध नाही. ओबीसींप्रमाणे इतर समाजासाठीही समित्या स्थापन करा. दलित आणि मुस्लिम समाजासाठीही उपसमिती स्थापन करा. एक उपसमिती शेतकऱयांसाठी स्थापन करा आणि मायक्रो ओबीसींसाठी एक वेगळी उपसमिती स्थापन करा, अशी मागणी जरांगे यांनी केली.