
प्रतिनिधी । परळी वैजनाथ
गेल्या चौदा दिवसापासून परळीत सुरू असलेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चाचे ठिय्या आंदोलन मंगळवारीही सुरू आहे. जे काही होईल ते परळीतच या भूमिकेवर मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील ठाम आहेत. राज्यात सुरू असलेले आंदोलन हे शांततेत होत असताना काही समाजविघातक वृत्ती आंदोलनात घुसून आंदोलन हिंसक होत आहे. या वृत्तीमुळे मराठा मोर्चा समन्वयकांच्या जीवितास धोका असल्याने राज्यसरकारकडे सुरक्षेची मागणी करण्यात आली आहे.
याच समाज विघातक वृत्तीपासून मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या जीवाला धोका असल्याने सुरक्षा देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे. यामध्ये मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील, रमेश केरे पाटील, महेश हरिदास डोंगरे, विवेकानंद यशवंत बाबर, सुनील सूर्यभान नागणे, संजय सावंत, अप्पासाहेब कुढेकर, संतोष सूर्यराव, अमित घाडगे यांना कायमस्वरूपी तात्काळ विनामोबदला सुरक्षा देण्याची मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री यांना करण्यात आली आहे.































































