मराठा आरमाराच्या मुख्यालयाचा इतिहास पर्यटकांसमोर उलगडणार

मराठा आरमाराचे मुख्यालय आणि अलिबाग समुद्रात अष्टगराचा राजा म्हणून विशेष ओळख असलेल्या कुलाबा किल्ल्याचा इतिहास आता पर्यटकांना समजणार आहे. हा किल्ला पाहण्यासाठी येणारे पर्यटक बुरूज पाहून देवीचे दर्शन घेतात आणि निघून जातात. मात्र आता त्यांना किल्ल्याच्या इतिहासाची आणि मराठा आरमाराच्या कार्यपद्धतीची माहिती सांगण्यासाठी 22 मार्गदर्शक तयार करण्यात आले आहे.

अलिबागचा विस्तीर्ण समुद्रकिनारा, नारळी-पोफळीच्या बागा, नैसर्गिक सौंदर्य याचा आनंद पर्यटक घेत असताना समुद्रात असणारा कुलाबा किल्ल्याला आवर्जून भेट देतात. कुलाबा किल्ल्यात उजव्या सोंडेचा सुवर्ण पंचायतन गणपती मंदिर, हनुमान मंदिर, शिव मंदिर, दर्गा, इतिहासकालीन तोफा, गोड्या पाण्याची विहीर, अंधारवाव, दारूगोळा ठेवण्याचे ठिकाण, कान्होजी आंग्रे घुमटी, सर्जेकोट यासह अनेक वास्तू इतिहासाची साक्ष म्हणून आहेत. मात्र ही सर्व ठिकाणे नक्की कुठे आहेत, किल्ल्याचा इतिहास काय आहे, याबाबत आलेल्या पर्यटकांना माहिती मिळत नव्हती. ही उणीव भरून काढण्यासाठी पुरातत्व विभाग, टुरिझम विभाग आणि बँक ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने 22 तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या मार्गदर्शकांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनीही या सर्व प्रशिक्षित तरुणांना कुलाबा किल्ल्याची माहिती दिली आहे.

स्थानिक तरुणांना रोजगार

कुलाबा किल्ला हा सागरी किल्ल्याची राजधानी म्हणून गणला जातो. कुलाबा किल्ल्यालाही ऐतिहासिक वारसा असून आजही तो अभेद्य आहे. किल्ल्यात येणाऱ्या पर्यटकाला कुलाबा किल्ल्याचा इतिहास माहीत होणे गरजेचे आहे. त्यासाठी स्थानिक तरुणांना प्रशिक्षण दिले गेले आहे. त्यामुळे कुलाबा किल्ल्याची इत्यंभूत माहिती पर्यटकांना कळणार असून स्थानिकांना रोजगारनिर्मितीही होणार आहे, अशी प्रतिक्रिया रघुजीराजे आंग्रे यांनी व्यक्त केली आहे.

  • किल्ल्यातील प्रत्येक भागाच्या इतिहासाची माहिती मार्गदर्शकांना देण्यात आली आहे.
  • त्यांच्याकडून किल्ल्याचा इत्यंभूत इतिहास पर्यटकांना सांगितला जाणार आहे.
  • किल्ले रायगडप्रमाणे आता कुलाबा किल्ल्याचा इतिहासही पर्यटकांसमोर शब्दरूपाने उभा राहणार आहे.