तुम्हाला अभ्यासच करायचा असेल तर आमचा नाईलाज, सरकारला दोन दिवसांचा वेळ देतोय; मनोज जरांगे यांचा इशारा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले असून त्यांनी 29 ऑगस्टला चलो मुंबईचा नारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी सोमवारी अंतरवाली सराटी येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या आंदोलनाबाबत माहिती दिली.

मनोज जरांगे म्हणाले की, 29 ऑगस्टला मुंबईला जायचे आहे. आपण अंतरवालीवरून 27 तारखेला सकाळी 10 वाजता निघणार आहोत. अंतरवाली – पैठण -शेवगाव (अहिल्यानगर), आळे फाटा, शिवनेरी (जुन्नर मुक्कामी) 28 तारखेला खेड मार्गे चाकण, लोणावळा, वाशी चेंबूरमार्गे 28 ला रात्री आझाद मैदानावर पोहोणार आहोत. 29 तारखेला सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर आंदोलन करणार आहोत. सरकार आणि फडणवीस यांना सांगतो की, आम्हाला कोणताही एक रस्ता द्या. जेणेकरून आझाद मैदानावर जाता येईल. आम्हाला ट्रॅफिक जाम करायचे नाही, असे त्यांनी म्हटले.

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, आमची प्रमुख मागणी मराठा कुणबी एकच आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्या शिवाय मुंबई सोडणार नाही. हैदराबाद गझेटियर लागू करा. 13 महिन्यापासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे. आम्हाला सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करून हवे. सरकारने मराठ्यांचा विषय समजून घ्यावा. 10 टक्के दिलेलं आरक्षण कधीही जाऊ शकते, आम्हाला आमची हक्काची जमीन द्या. भाड्याने घर देऊ नका. आमच्या दीडशे वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत. सगेसोयरेची अधिसूचना तुम्ही काढली. तिची अंमलबजावणी नाही. तुम्ही त्यावेळेस सांगितले होते की, आम्ही 2012 च्या कायद्यात दुरुस्ती केली. आम्हाला सहा महिन्यासाठी अंमलबजावणीला वेळ द्या. हरकती मागवून त्याच्यावर छाननी करतो. आता छाननी करून आणि आम्ही दिलेला वेळ मिळून दीड वर्ष झालेले आहे. इतका कोणता समाज थांबू शकत नाही. इतका संयमाने माझ्या समाजाने हा विषय घेतलेला आहे.

राज्यातील सर्व मराठ्यांनी कामधंदे बंद करा..व्यवसाय बंद ठेवा.. नोकरदार यांनी काम बंद करा… मुंबईकडे निघा….जगाच्या पाठीवर या विजयाच्या सोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी व्हा, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले. कोणी शेताचे कारणे सांगू नका…जिथे जिथे टँकर असतील तिथे पाणी टँकर घ्या..समाजातील सर्व डॉक्टरांनी गोळ्या औषध घेऊन या…राजकारण्यांनी त्यांची वाहने द्या, असंही मनोज जरांगेंनी सांगितले. मला आंदोलन शांततेत पाहिजे, असेही ते म्हणाले.

जर तुम्हाला अभ्यासच करायचा असेल तर त्याला आमचा नाईलाज आहे. आम्ही ऐकू शकत नाही. जर आमच्या नोंदी सापडल्या तर त्या आम्हाला पाहिजेत, असे मनोज जरांगे यावेळी म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिलं. मी आजपासून काहीही बोलणार नाही. मी सरकारला दोन दिवसांचा वेळ देतोय असे मनोज जरांगे यांनी सांगितले. त्यासोबत मनोज जरांगेंनी आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

मराठा आणि कुणबी हा जीआर आम्हाला मंजुरीसह पाहिजे. त्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही. हैदराबाद गॅझेट लागू केलं पाहिजे. त्यावर अभ्यास चालला हे ऐकून घेणार नाही. तुम्ही कारण सांगितलेली ही ऐकून घेणार नाही. गेल्या १३ महिन्यांपासून गॅझेटच सुरु आहे. तरी जर तुम्हाला अभ्यासच करायचा असेल तर त्याला आमचा नाईलाज आहे. आम्ही ऐकू शकत नाही. जर आमच्या नोंदी सापडल्या तर त्या आम्हाला पाहिजेत, असे मनोज जरांगे यावेळी म्हणाले.