राजकारणाशी आम्हाला काही देणेघेणे नाही. सरकारने ठरल्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्यावे, सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करत मनोज जरांगे–पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. पोलीस तसेच प्रशासनाने उपोषण न करण्याची केलेली विनंती जरांगे यांनी धुडकावून लावत शनिवारपासून आंतरवाली सराटीत बेमुदत उपोषण सुरू केले आहे. कायद्याने मला उपोषण करण्याचा अधिकार दिला आहे, असेही त्यांनी बजावले. दरम्यान, उपोषणाला परवानगी नाकारण्याचे षड्यंत्र फडणवीसांचे असल्याचा स्पष्ट आरोपही त्यांनी यावेळी केला.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आजपासून आंतरवाली सराटीत उपोषण सुरू केले. गावकऱ्यांनी केलेला विरोध, पोलीस तसेच प्रशासनाने केलेली विनंती पाहता उपोषणाबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर अंबडच्या प्रभारी तहसीलदार धनश्री भालचिम यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली, परंतु जरांगे यांनी प्रशासनाची विनंती फेटाळली. सकाळीच ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन त्यांनी उपोषणाला प्रारंभ केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी उपोषणाला परवानगी नाकारण्याचे षड्यंत्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे असल्याचा आरोप केला. सरकारने परवानगी नाकारली तरी मी उपोषणाच्या निर्णयावर ठाम असल्याचे जरांगे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महाराणा प्रताप, अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे यांनाही विरोध झालाच होता. लोकशाही मार्गाने न्याय्य हक्कासाठी आंदोलन करणे हा आपला अधिकार असल्याचेही त्यांनी बजावून सांगितले.
तातडीने विशेष सभा बोलावली
मनोज जरांगे यांनी उपोषणासाठी ग्रामसभेची परवानगी घेतली नसल्याचे पोलीस प्रशासनाने म्हटले होते. त्यामुळे उपोषण सुरू करण्यापूर्वी तातडीने आंतरवाली सराटी ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष सभा बोलावण्यात आली. ‘मनोज जरांगे यांचे उपोषण गावात होऊ द्यायचे की नाही’ असा एका ओळीचा ठराव मांडण्यात आला. या सभेत सभेच्या बाजूने पाच, तर सभेच्या विरोधात पाच अशी समान मते पडली. त्यामुळे सरपंचांना मत देण्यास सांगण्यात आले. सरपंचांनी सभेच्या बाजूने मतदान केल्याचे ग्रामसेवक एस. जे. शेख यांनी सांगितले.
डॉक्टरांच्या पथकाने केली जरांगे-पाटलांची तपासणी
उपोषणाच्या पहिल्याच दिवशी डॉक्टरांच्या पथकाने मनोज जरांगे यांची तपासणी केली. जरांगे यांच्या नाडीचे ठोके 82, तर रक्तदाब 104/70 असून रक्तातील साखरेचे प्रमाण 89 असल्याचे डॉ. दीपक सोनवणे यांनी सांगितले.
मोदी गरीबांचे ऐकत नाहीत
पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन करून उपयोग नाही. मोदींच्या कानावर गरीबांचा आवाज पडत नाही. गरीबांची गरज त्यांना केवळ सत्ता मिळवण्यापुरती होती. आता त्यांना गरीबांची गरज उरली नाही, असा टोलाही मनोज जरांगे यांनी लगावला.
मराठा आमदारांनी सरकारवर दबाव आणावा
विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला कोणकोणते आमदार पाठिंबा देतात याकडे आमचे बारीक लक्ष आहे. आमदारांनी मराठा आरक्षणासाठी सरकारवर दबाव आणावा, असेही मनोज जरांगे म्हणाले. जे आमदार मराठा आरक्षणावर भूमिका घेणार नाहीत त्यांना मराठा समाज कायमचे घरी पाठवणार असल्याचेही जरांगे यांनी स्पष्ट केले.