पुणे – आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणातील दोघांना अटक

‘मराठे ज्वेलर्स’चे मिलिंद ऊर्फ बळवंत मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी दोघांना रविवारी अटक केली. निलेश उमेश शेलार (रा. मानकर रेसिडेन्सी, कोथरुड) व दीप्ती सरोज काळे (रा. बावधन, उत्तमनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मराठे यांच्या पत्नी निना बळवंत मराठे (वय 60, रा. रुपाली सोसायटी, एरंडवणे) यांनी फिर्याद होती.

‘मराठे ज्वेलर्स’चे मालक मिलिंद ऊर्फ बळवंत मराठे (वय 60) यांनी 15 डिसेंबर 2020 या दिवशी रात्री आठ वाजता त्यांच्या दुकानामध्ये पिस्तुलातुन गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान 27 डिसेंबरला त्यांचा मृत्यु झाला होता.

घटनेनंतर त्यांच्या मुलाने व्यवसायातील मंदी व आर्थिक अडचणीमुळे वडिलांनी आत्महत्या केल्याचा जबाब पोलिसांना दिला होता. त्यानंतर मराठे यांच्या पत्नीने दोन दिवसांपुर्वी मराठे यांना निलेश शेलार व दीप्ती काळे यांनीच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फिर्याद दिली होती.

त्यानुसार पोलिसांनी शनिवारी रात्री दीप्ती काळेला उत्तमनगर येथील घरातून अटक केली. तर निलेश शेलार याला त्यापुर्वीच अटक केली. शेलारला न्यायालयाने 23 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दीप्ती काळेची तब्येत बिघडल्याने तिला उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या