शो मस्ट गो ऑन!

1328

>> प्रिया मराठे, अभिनेत्री

शूटिंगमध्ये सतत बिझी असल्याने मला आणि शंतनुला इतकी मोठी सुट्टी कधीच मिळाली नव्हती. लॉकडाऊनच्या सुरुवातीचे दिवस आम्ही छान आनंदात घालवले. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागली, आजूबाजूची परिस्थिती बिघडत चालली तसतसे आम्हालाही टेन्शन येऊ लागले. त्या काळात खूप मजूर आपल्या कुटुंबीयांसमवेत रस्त्यावरून मूळ गावी चालत जाताना दिसत होते. आमचे घर हायवेच्या बाजूलाच असल्याने न्यूज चॅनेलवर दाखवली जाणारी ही परिस्थिती आम्ही आँखो देखी पाहिली होती. हे पाहून मन सुन्न व्हायचे. सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून अशा लोकांसाठी केळी, पाण्याच्या बाटल्या, बिस्किटांचे वाटप करून आम्ही आमच्यापरीने मदत करण्याचा छोटासा प्रयत्न केला.

शूटिंग नाही म्हणून मी फक्त घरात बसून राहिले नाही. सतत स्वतःला बिझी ठेवले. कुकिंगची मला फार आवड आहे. एरव्ही मला त्यासाठी वेळ मिळत नाही. या दरम्यान मी पुरणपोळीपासून ते मोदकापर्यंत वेगवेगळे पदार्थ बनवले. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त घरच्या घरी केक बनवला. या इंडस्ट्रीत राहायचे असेल तर शारीरिक फिटनेस खूप महत्त्वाचा आहे. या दरम्यान जीम बंद असल्या तरी आम्ही दोघांनी घरच्या घरी सूर्यनमस्कार, योगा केला. मेडिटेशन करण्याची माझी खूप दिवसांची इच्छा होती. ती या दरम्यान पूर्ण केली. मन प्रसन्न ठेवण्यासाठी मेडिटेशनचा खूप उपयोग झाला.

घरीसुद्धा छोटे उपक्रम आम्ही राबवले. कितीही संकटे आली तरी शो मस्ट गो ऑन असे म्हटले जाते. शूटिंग ठप्प असले तरी लोकांचे मनोरंजन करण्याचे काम सुरूच होते. सुनील बर्वे यांच्या सुबकची निर्मिती असलेल्या ‘ऑनलाइन माझं थिएटर’ या उपक्रमात २० स्पर्धक आणि चार टीम सहभागी झाल्या होत्या. त्यात आम्ही सुद्धा भाग घेतला होता. दर शनिवार आणि रविवारी आमचे परफॉर्मन्स असल्याने त्याची आठवडाभर तयारी सुरू असायची. या उपक्रमामुळे शेवटचा महिना खूप छान गेला. प्रेक्षकांचाही याला चांगला प्रतिसाद मिळाला.

आत्मविश्वास वाढला

या परिस्थितीमुळे एक गोष्ट शिकायला मिळाली ती म्हणजे कुणावरही अवलंबून न राहणे. घरकाम करणार्‍या मावशी आल्या नाहीत तर  स्वयंपाक, साफसफाई कोण करणार? जीम बंद असेल तर व्यायाम कसा करायचा? असे प्रश्न एरव्ही पडायचे. परंतु आयुष्य कुणासाठी थांबत नाही. स्वतःची काळजी आपण स्वतः घेऊ शकतो याचा आत्मविश्वास लॉकडाऊन दरम्यान निर्माण झाला.

आपली प्रतिक्रिया द्या