समाजमन ढवळून काढणारी भाषा हीच मराठीची खरी ओळख

अन्यायाविरोधात समाजमन ढवळून काढणारी भाषा हीच मराठीची जगभरात ओळख आहे. हजारो वर्षांची वैभवशाली परंपरा असलेल्या मराठी भाषेच्या वैभवात उत्तरोत्तर भर पडत आहे. त्यामुळे मराठीचे हेच वैभव भविष्यातही कायम ठेवण्यासाठी प्रत्येकाने दैनंदिन जीवनात मराठी भाषेला प्राधान्य देण्याचा, मराठी संस्कृती जपण्याचा निर्धार करत शिवसेना भवन येथे मोठय़ा उत्साहात आज मराठी भाषा दिवस साजरा केला.

ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त आज सर्वत्र मराठी भाषा दिवस साजरा केला जात आहे. त्यानुसार स्थानीय लोकाधिकार समिती महासंघानेही शिवसेना भवन येथे मराठी भाषा दिवस कार्यक्रम आयोजित केला होता. मराठी भाषा ही चळवळीची भाषा आहे. शिवसेनाप्रमुखांनी याच भाषेच्या माध्यमातून मराठी माणसासाठी लढा उभारला, त्यांना नोकऱया मिळवून दिल्याचे महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते-खासदार गजानन कीर्तिकर यांनी सांगितले. सध्या पेंद्रातील सत्ताधाऱयांनी प्रत्येक गोष्ट मुंबई आणि महाराष्ट्रातून गुजरातकडे पळवण्याचा सपाटा लावला आहे. त्याविरोधातही आपण सर्व मराठी लोकांना लढा उभारावा लागेल असेही त्यांनी सांगितले. आम्ही स्वातंत्र्यलढा पाहिला नाही, पण मराठी भाषेच्या संवर्धनाबरोबरच मराठी माणसासाठी शिवसेनाप्रमुखांनी उभारलेला लढा आम्ही पाहिला आहे. त्या लढय़ाचा प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटतो, असे भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष-खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले. स्थानीय लोकाधिकारी समिती महासंघ ही संघटना मराठी भाषा आणि मराठी माणसासाठी काम करत असल्याचे महासंघाचे सरचिटणीस, शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी आमदार विलास पोतनीस, माजी आमदार सुनील शिंदे, रमाधामचे अध्यक्ष चंदूमामा वैद्य, शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक रवींद्र पुवेसकर, मकरंद सावंत उपस्थित होते. महासंघाचे चिटणीस वामन भोसले यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. भारतीय कामगार सेनेच्या अध्यक्षपदी खासदार अरविंद सावंत यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आल्याने गजानन कीर्तिकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

मराठी भाषेचा गौरव एका दिवसापुरता नको – मुख्यमंत्री
स्थानीय लोकाधिकार समितीने आयोजित केलेल्या मराठा भाषा दिवस कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून शुभसंदेश दिला. मराठी भाषा दिनानिमित्त केवळ आजच्या दिवसापुरता मराठी भाषेचा गौरव व्हायला नको, तर दररोजच गौरव झाला पाहिजे. समृद्ध मराठी भाषेची आपण लेकरं आहोत. त्यामुळे प्रत्येकाने मराठीचा स्वाभिमान बाळगला पाहिजे. ती बोलताना कमीपणा वाटू देऊ नका, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या