
‘दार उघडणार, नशिबाचा खेळ पालटणार’ अशी टॅगलाईन घेत यंदाचा ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सिझन उद्या, रविवारपासून सुरू होत आहे. घरात कोण स्पर्धक असणार या सस्पेन्सवरून अखेर आज पडदा हटणार आहे. यंदाच्या सिझनचे सूत्रसंचालन रितेश देशमुख सांभाळणार आहे. ‘बिग बॉस’चे घरदेखील आकर्षणाचा विषय असतो. आठशे खिडक्या नऊशे दारं आणि प्रत्येक दाराच्या मागे लपलंय एक रहस्य… दारातून लागू शकतो चकवा अशा थीमने यंदाचे ‘बिग बॉस मराठी’चे घर सजवण्यात आले आहे.
यंदा ‘बिग बॉस’चे आर्ट डायरेक्टर उमंग कुमार यांनी मराठमोळा टच देण्याऐवजी घराला इंटरनॅशनल लूक देण्यावर भर दिला आहे. ‘आपण कलाकार मराठी आणणार आहोत. स्पर्धक मराठीत बोलणार आहेत. त्यामुळे मराठी यात कुठेही लपली गेलेली नाही. फक्त यंदा थोडा हटके लूक दिला आहे’, असे उमंग कुमार यांनी सांगितले. ‘बिग बॉस मराठी’च्या संभाव्य स्पर्धकांमध्ये लावणी नृत्यांगना गौतमी पाटील, अनुश्री माने, अथर्व रुके, गिरिजा ओक, ईशा केसकर यांच्या नावाची चर्चा आहे.






























































