
मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांना मराठीसह रोजच्या वापरातील सोप्या इंग्रजी शब्दांची ओळख व्हावी यासाठी मराठी माध्यमाच्या पाठय़पुस्तकातून विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्दांची ओळख करून देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून पहिलीच्या पाठय़पुस्तकांमधून मराठी शब्दांना पर्यायी इंग्रजी शब्द, मराठी वाक्यांची इंग्रजीतील वाक्यरचना अभ्यासता येणार आहे. सध्या राज्यातील 488 मॉडेल स्कूलमध्ये हा द्वैभाषिक पाठ्यपुस्तकांचा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाला आहे.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये राबविण्यात येणाऱया एकात्मिक आणि द्विभाषिक पाठय़पुस्तके उपक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱयांची गुरुवारी बैठक घेतली. या बैठकीत वर्षा गायकवाड यांनी बालभारतीला उच्च दर्जाची, आकर्षक पाठय़पुस्तक निर्मिती करण्याची सूचना केली. याआधीही शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पहिलीपासून एक पुस्तक योजना आणण्याचे ठरविले आहे. येत्या शैक्षणिक वर्षात पहिलीच्या मराठी, इंग्रजी, गणित आणि खेळू आणि शिकू या चार विषयांसाठी एकच पुस्तक सत्रनिहाय अभ्यासक्रमाप्रमाणे दिले जाणार आहे. यात आता मराठीबरोबर इंग्रजी शब्दांची ओळखही मातृभाषेतून शिकणाऱया विद्यार्थ्यांना करून दिली जाणार आहे.
विद्यार्थ्यांना संकल्पना स्पष्ट व्हावी
द्विभाषिक पाठय़पुस्तकाद्वारे विद्यार्थ्यांच्या मनातील विषयाची संकल्पना स्पष्ट व्हावी हा हेतू आहे. भाषा विषयाच्या पाठय़पुस्तकात पर्यायी इंग्रजी शब्द दिले आहेत. पुढे विज्ञानाच्या पाठय़पुस्तकातही मराठी शब्दांना पर्यायी इंग्रजी शब्द देण्याचा विचार आहे. पुढील शैक्षणिक वर्षात राज्यातील 488 मॉडेल स्कूलमध्ये दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारची पाठय़पुस्तके आणली जातील. त्यानंतर राज्यातील सर्व शाळांमधील दुसरीच्या वर्गांना शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये ही द्विभाषिक पाठय़पुस्तके दिली जातील.
– के. बी.पाटील, संचालक, बालभारती
चित्र, शब्द, उच्चार आणि अर्थही
पाठय़पुस्तकांची मांडणी रंगीबेरंगी आणि आकर्षक करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या मनावर शब्दांपेक्षा चित्रांचा प्रभाव जास्त होतो. त्यामुळे चित्र, त्यानुसार त्याला योग्य असलेला शब्द, त्या शब्दाचा उच्चार आणि अर्थ पाठय़पुस्तकात मराठी आणि इंग्रजी भाषेतही दिला आहे. पहिलीच्या अभ्यासक्रमात ज्या ज्या ठिकाणी वाचनाचा संबंध येतो त्या त्या ठिकाणी मराठी शब्दांना पर्यायी इंग्रजी शब्द देण्यात आला आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना एकाचवेळी मराठीसह इंग्रजी शब्दांचीही ओळख होईल.

























































