पोरींच्या पावलांचा मंत्रजागर

259

>> संजय कृष्णाजी पाटील

शेणाला गेलेल्या पोरी’ हा चंद्रशेखर कांबळे यांच्या एकूण साठ कवितांचा पहिलाच कवितासंग्रह आहे. शेताबांधावर नजर रुतवून बदलत्या ग्रामव्यवस्थेचा सर्जनशील आलेख मांडू पाहणाऱया नव्या दमाच्या लेखक, कवींना अभिव्यक्तीचं हक्काचं व्यासपीठ मिळवून देणाऱया ‘दर्या प्रकाशना’ने तो प्रकाशित केलेला आहे. ‘बदलत्या ग्रामव्यवस्थेचा सर्जनशील आलेख’ असा शब्दप्रपंच करताना मुळातच ती ग्रामव्यवस्था काय होती याचे संबंधित लेखक, कवींना साक्षेपाने आकलन असावे लागते. चंद्रशेखर कांबळे यांचे हे आकलन त्यांच्या कवितांमधूनच ध्यानात येते.

‘पोरी जनावरं समजून शेणी थापतात
थापलेल्या शेणी मातीशी बिलगतात
एकरूपतेसाठी आधी आपणही विरघळावं लागतं
पोरी, शेणातून सांगतात’

यातून कवी शेणाला जाणाऱया पोरींचा जगण्याशी असलेला त्याचा नितळ जिव्हाळा व्यक्त करतो. यंत्रयुगाचं आगमन नव्हतं आणि वैज्ञानिक शोधांचा भडीमार नव्हता तेव्हा माळरानावरून, रानवाटांतून शेण गोळा करणाया आणि त्याच्या शेणी थापणाऱया निरलस कष्टाळू पोरींच्या धुळभरल्या पावलांचा कलात्मक पाठलाग करतो. या कवितांमधून बाईची दुःख सोसण्याची कालच जणू कवी मांडतो.

या शेणाला गेलेल्या पोरी अत्यंत निर्मळ, नीतीवान, निर्भिड, सोज्वळ असल्या तरी प्रसंगी त्या आक्रमकही आहेत. क्रिकेटचा खेळ खेळताना चेंडू मुद्दाम पोरींच्या शेणाकडे मारणाऱया टारगट पोरांच्या पाठीमागे पायताण घेऊन लागण्याइतका सजग रागीटपणाही त्या सदासर्वकाळ बाळगून आहेत. त्या सोशिक असल्या तरी सावधचित्तही आहेत.

या सर्वच कविता ग्रामजीवनातल्या सणपरंपरा आणि सहानुभवांचा लोकजागर मांडतात. सोबत पोरींच्या ध्येयाचे चित्र मांडते. शिमग्याच्या सणाला पोरी शहरात कशा जातात आणि दहीदूध विकणाऱया बायकांसारख्या दहाला दोन शेणी आणि पाचाला एरंडाची डहाळी विकताना तार तुटल्यासारखी कशी आरोळी मारतात याचेही चित्रण ही कविता करते. तसेच ती शंकरपार्वतीच्या रुसव्या-फुगव्यांपासून ते नरकासुर वधाच्या पुराणकथांचे दाखले देत सर्व काळात हिंडत राहते, सर्वव्यापी होते.

मनुष्याचा जन्म हा काही केवळ शेता-बांधावरच मांडला आणि पुकारला जात नाही, तर तो जगण्या-मरण्याचा फेर सोबत घेऊन सगळ्या भूतलावर गरगरत असतो. पोर जन्माला आल्यानंतर बाळंतिणीला धुरी देण्यासाठी जशा शेणी लागतात तशाच त्या शहरातल्या स्मशानातसुद्धा. विद्युतदाहिनी नसेल तर लाकडासोबत शेणीही लागतातच. म्हणजे पहिल्या टय़ह्यापासून ते अखेरीच्या आक्रोश किंकाळीपर्यंत या शेणींच्या सहमतीचा प्रवास सुरूच असतो. त्यामुळे मग कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या एका कवितेतल्या ओळींमधील ‘पाळण्यापासून ते चितेपर्यंत लाकडाची संगत काही सुटत नाही’ या विधानाची सत्यता पटते. मुळातच शेणाला जाणाया पोरी हा दीर्घकवितांचा विषय असू शकतो ही आजच्या काव्य क्षेत्रामधली अचंबित करणारी गोष्ट आहे. परकर, पोलक्यातल्या पोरींपासून ते समंजस आणि कष्टाळू बाईपणापर्यंतचा परीघ ही कविता नेटाने मांडते, तिच्या सुखदुःखाचा पदर उलगडून दाखवते.

शेण आणि पोरींचे भोग सरता सरत नाहीत. ही कविता जगण्यातल्या अटळ संघर्षाला आणि व्यथा वेदनेला यथोचितपणे भिडते. यातल्या पोरींच्या पावलांचा मंत्रजागर कविता वाचून संपल्यानंतरही मेंदूमध्ये किणकिणत राहतो.

‘बदललं सारं, बदलली घरं
माणसं गेली हरवून
गावानेही गिरवला तोच कित्ता
आलाच एखादा पाव्हणा तर,
सुनं अंगण विचारतं त्याला
शेणी लावणाऱया पोरींचा पत्ता’

शेणाला गेलेल्या पोरी
कवी – चंद्रशेखर कांबळे
प्रकाशक – दर्या प्रकाशन
मुखपृष्ठ – बाळ पोतदार,
मूल्य – रुपये 150/-

आपली प्रतिक्रिया द्या