राज्यात मराठा, दलित आणि मुस्लिम समाजावर सर्वाधिक अन्याय होत आहे. हा अन्याय रोखण्यासाठी या समाजांनी एकत्र येणे गरजेचे आहे. असे झाले तर राज्यात अशक्य ते शक्य होईल, असे प्रतिपादन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले.
मिटमिटा परिसरातील डोंगरावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक ‘ऊर्जाभूमी’ उभारली जात आहे. याच ऊर्जाभूमी केंद्रावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे. या पुतळ्याचा पायाभरणी समारंभ आज रविवारी मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी विद्रोही जलसाकार संभाजी भगत, प्रा. चंद्रकांत भराट, रखमाजी जाधव, कवयित्री डॉ. प्रतिभा अहिरे, शिवसेनेचे पश्चिम विधाससभाप्रमुख राजू शिंदे, प्रा. सुनील मगरे आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना जरांगे म्हणाले की, ऊर्जाभूमीचे संकल्पक चेतन कांबळे वंचितांच्या न्यायाची लढाई लढत आहेत. मराठा आरक्षणसाठी सनदशीर मागनि मी लढा देत आहे. राज्यकर्ते मात्र समाजाची फसवणूक करत आहेत. समाजासमाजात भांडण लावण्याचे काम केले जात आहे. याचा फटका मराठा, दलित आणि मुस्लिम समाजाला बसत आहे. त्यामुळे या समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी समाज एकत्र येतो, याची प्रचिती श्री क्षेत्र नारायणगडावर आली. अशाच पद्धतीने मराठा, दलित आणि मुस्लिम समाजाला परिवर्तनासाठी मनातून तयारी करावी लागणार आहे.
जरांगे पाटलांनी मशाल पेटविली
ऊर्जाभूमी परिसरात उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाभरणी समारंभात प्रमुख पाहुणे मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते ‘मशाल’ पेटविण्यात आली. ही मशाल हाती घेऊन स्मारकाचे संकल्पक चेतन कांबळे यांनी उपस्थितांना दाखविली.
प्रास्ताविकात ऊर्जाभूमीचे संकल्पक, माजी नगरसेवक चेतन कांबळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, महासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, राजषीं शाहू महाराज या महापुरुषांचा विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. याच विचारातून दहा वर्षांपासून ऊर्जाभूमी उभारण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते भदन्त डॉ. संदामुनी महास्थवीर, भदन्त विशुद्धानंद बोधी महास्थवीर, भदन्त संघप्रिय बोधी थेरो आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास ऊर्जाभूमीचे अध्यक्ष सौरभ कांबळे, सचिव कुंदन वाकपांजर, आनंद लोखंडे, सतीश शेगावकर, रीमा कांबळे यांच्यासह समाजबांधव, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाभाऊ शिरसाठ व डॉ. यशवंत कांबळे यांनी केले.