निर्मात्यांना त्यांच्या हक्काचा निधी वाटला, संस्थेचे बँक खाते गोठल्याने रंगमंच कामगार मदतीपासून वंचित

490

मराठी नाटय़ व्यावसायिक निर्माता संघाने सदस्यांना त्यांच्या हक्काचे पैसे वाटले आहेत. यामध्ये कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. मात्र अध्यक्ष आणि खजिनदारांनी त्यांचा राजीनामा मंजूर होण्यापूर्वीच बँकेला कळवल्याने तीनपैकी दोन सदस्यांच्या स्वाक्षऱया बाद होऊन संस्थेचे बँक खाते गोठवण्यात आले. त्यामुळे रंगमंच कामगार दोन लाख रुपयांच्या मदतीपासून वंचित राहिले आहेत, अशी माहिती आज निर्माता संघाच्या सदस्यांनी दिली. 14 लाखांच्या धनादेशावर सही करणाऱ्यांनी रंगमंच कामगारांच्या धनादेशावर का सही केली नाही, असा सवालही त्यांनी केला.
मदतनिधी वाटपातील मतभेदानंतर अध्यक्ष अजित भुरे यांच्यासह काही सदस्यांनी राजीनामे दिले. रंगमंच कामगारांना मदत करण्याआधी निर्मात्यांनी स्वतछचेच धनादेश आधी काढले, असा आरोप राजीनामा देण्याच्या काही सदस्यांनी केला. याबाबत खुलासा करण्यासाठी निर्माता संघाने यशवंत नाटयंमदिर येथे आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावंळी संस्थेचे प्रमुख कार्यकाह (काळजीकाहू) राहुल भंडारे, ज्ञानेश भालेराव, प्रदीप कबरे, संतोष काणेकर उपस्थित होते. झूम ऍपद्वारे वैजयंती आपटे, भरत जाधव यांनीही सहभाग घेतला.

निर्माता संघाने सदस्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मदतनिधी म्हणून नव्हे तर ‘सहाय्य’ म्हणून दिलेले आहेत. संस्थेची बदनामी करण्याचा डाव असून कार्यकारिणीतील जोर कमी झाला म्हणून राजीनामा नाट्य खेळल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. निधीसंदर्भातील विशेष ठरावाची माहिती धर्मादाय आयुक्तांना ईमेलद्वारे देण्यात आलेली होती. निधीवाटप प्रक्रिया अध्यक्ष अजित भुरे आणि प्रमुख कार्यकाह राहुल भंडारे यांच्या स्वाक्षरीनेच झाले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

नाटक करताना निर्माता 15 ते 30 लाख रुपये घालत असतो. त्यामानाने 50 हजार ही रक्कम छोटी आहे म्हणूनच हा एक साह्य निधी होता. ठराव करून तो संमत झाला. 44 सदस्यांनी त्याला होकार दिल्यानंतर ते वाटप झालं. सदस्यांना अडीअडचणीत संस्थेकडून संघटनेकडून मदतीची अपेक्षा असताना ते सक्रीय नाही, असं म्हणणं कितपत योग्य आहे.
– संतोष काणेकर

गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक निर्माता आपआपल्या परीने फंडात पैसे टाकत होता. हा फंड निर्मात्यांसाठीच होता. सदस्यांच्या आजारपणात किंवा काही अपघात झाला तर त्यातून त्याला पैसे देता यावेत म्हणून ही तजवीज होती. कोरोनाच्या संकटात आधी ज्यांची नाटकं थांबली त्यांनाच पैसे द्यायचा विषय होता. पण जसा लॉकडाऊन वाढू लागला तसे निर्मातेही अडचणीत येऊ लागले. त्यांच्यासमोरही आर्थिक अडचणी उभ्या ठाकल्या. त्यावेळी बहुमताने गरजू सर्व निर्मात्यांना साह्य करण्याचा विषय झाला. त्यामुळे तसे अर्ज मागवले गेले. 28 अर्जदारांना प्रत्येकी 50 हजार असे 14 लाखांचे सहाय्य केले. – राहुल भंडारे, प्रमुख कार्यवाह (काळजीवाहू)

आपली प्रतिक्रिया द्या